निर्णय नियमबाह्य़ असल्याचा आरोप

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) व्यवस्थापनाने हंगामी कामगार भरतीचे केलेले नियोजन नियमबाह्य़ असल्याचा आरोप करत एचएएल एम्प्लॉईज युनियनने त्यास विरोध केला आहे. उपरोक्त प्रक्रियेत भरती होणाऱ्या कामगारांसह सध्या नोकरीत असणाऱ्या कामगारांचे शोषण करणे हा एकमेव उद्देश असून नाशिक विभागात होणारी हंगामी भरती थांबवून ती कायमस्वरूपी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

एचएएल व्यवस्थापनाने चार वर्षांसाठी हंगामी कामगार भरतीसाठी २० डिसेंबर रोजी येथील क. का. वाघ कृषी महाविद्यालयात परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यास कामगार संघटनेने विरोध दर्शविला. एचएएल ही नवरत्न दर्जा प्राप्त झालेली कंपनी असून आजपर्यंत कामगारांनी त्यांना दिलेले प्रत्येक उत्पादनाचे ध्येय वेळेत पूर्ण केलेले आहे. या शिवाय, कंपनीकडे भविष्यात नवीन बरेच प्रकल्पही आहेत. मग, अशी चांगली स्थिती असताना एचएएल व्यवस्थापन कायमस्वरूपी भरती न करता चार वर्षांसाठी हंगामी भरती का करत आहे, असा प्रश्न संघटनेचे सरचिटणीस संजय कुंटे यांनी उपस्थित केला. कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे. सर्व नियम निकष बाजूला ठेऊन परीक्षेच्या माध्यमातून केवळ चार वर्षांसाठी ही हंगामी भरती केली जाणार आहे. हे अन्यायकारक आहे. या बाबत राजकीय पक्षांचे नेते आणि इतर कामगार संघटनेचे नेते यांच्याशी चर्चा करत ही भरती थांबविण्याची मागणी संघटना करणार आहे. ही भरती कामगार व कामगार संघटनेसाठी घातक आहे. कामगारांच्या भविष्यावर टांगती तलवार ठेवत त्यांच्यावर दबाव टाकत, कामगारांची पिळवणूक करणे हा उद्देश असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या बाबत तातडीची सभा घेऊन या भरतीला विरोध करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Story img Loader