महाराष्ट्राची मराठी रंगभूमी गाजवत असलेल्या नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’ या दत्ता पाटील लिखीत व सचिन शिंदे दिग्दर्शित प्रायोगिक नाटकाची राष्ट्रीय नाटय़ शाळेच्या वतीने (एनएसडी) १९ व्या भारत रंग महोत्सवासाठी निवड झाली आहे. देशासह विदेशातून आलेल्या एकूण ६०० प्रस्तावातून ५० भारतीय आणि १९ विदेशातील नाटकांची महोत्सवासाठी निवड झाली. महाराष्ट्रातून या वर्षी महोत्सवासाठी निवड झालेले हंडाभर चांदण्या हे एकमेव मराठी प्रायोगिक नाटक आहे.

या बाबतची माहिती नाटकाचे निर्माते सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या नाटकाने मुंबईतील आविष्कार, साहित्य संघ आणि चाळीसगावमधील महोत्सव गाजवला आहे. नुकताच नाटय़ निर्माता संघाच्या स्पर्धेत सवरेत्कृष्ट नाटकाचा एक लाखाचा मोहन वाघ स्मृती पुरस्कारही पटकावला. लेखन दिग्दर्शनासह सात वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली आहेत. या नाटकात पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोटय़ाशा दुष्काळी गावातील विलक्षण कथा त्यात आहे. लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक आणि टोकदार भाष्य करणाऱ्या या दीर्घाकात प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे असून नेपथ्य ईश्वर जगताप व राहुल गायकवाड, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा श्रद्धा देशपांडे, रंगभूषा माणिक कानडे, संगीत रोहित सरोदे यांचे आहे. निर्मिती व्यवस्था सदानंद जोशी व कैलास पाटील यांची आहे.

एनएसडीचा ‘भारंगम’ महोत्सव आशिया खंडातील सर्वात मोठा नाटय़ महोत्सव मानला जातो. १ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीत होणाऱ्या महोत्सवात ५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दिल्लीतील श्रीराम सेंटर ऑडिटोरियम येथे हंडाभर चांदण्यांचा प्रयोग रंगणार आहे. दरम्यान, या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने सांघिक कामाला असल्याचे प्रतिक्रिया लेखक दत्ता पाटील व दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी व्यक्त केली. नाशिकच्या कलावंतांना घेऊन आता देशविदेशातील नाटकांच्या पंगतीला बसण्याचा मान मिळाल्याने रंगभूमीवरील कामाचे सार्थक झाल्याचे त्यांनी नमूद केले. सोशन नेटवर्किंग फोरमने गेल्या वर्षीच्या दुष्काळात महत्त्वाकांक्षी जलअभियान हाती घेतले. त्या अंतर्गत पाच महिन्यात पाच गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यात आले. फोरमने या अभियानाच्या निधी संकलनासाठी या नाटकाचे प्रयोग अनेक ठिकाणी केले. त्या माध्यमातून आयएमएच्या नाशिक शाखेने साडे तीन लाख रुपये तर अन्य प्रयोगातूनही निधी संकलन झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.