स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेत अखंड हिंदूराष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
भगूर येथील शिवाजी चौकात भाजपच्या ‘आझादी के ७० साल, याद करो कुर्बानी’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, खा. हेमंत गोडसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, दादासाहेब देशमुख, वसंत गीते, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. प्रारंभी सावरकर यांच्या भगूर येथील जन्मस्थळी भेट देत अहिर यांनी सावरकरांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेत सावरकर स्मारकाला भेट देऊन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. या वेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तानचे शेपूट वाकडे असून ते सरळ कसे करायचे हे माहीत असून काश्मीरमध्ये शांतता निर्माण होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या मदतीवर पाकिस्तान तगलेला असून असा देश काश्मिरींना कशी मदत करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यापुढे पाकिस्तानशी काश्मीर नव्हे, तर केवळ पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान यावर चर्चा होईल, असेही अहिर यांनी ठणकावले.
प्रास्ताविकातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे यांनी देवळाली रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाबरोबरच या स्थानकाला सावरकर यांचे नाव देण्याचा तसेच सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. भगूर, देवळालीसह सिन्नर, इगतपुरी आदी भागांतून मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी परिसरातील शहीद जवानांच्या वारसांचा, सेवानिवृत्त व जवानांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी भगूरमध्ये मोटारसायकल फेरी काढण्यात आली.