नाशिक – वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून भाजप सरकारचा जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे. त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

रविवारी येथे सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. मराठी शाळा बंद होत आहेत. रोजगार नाही. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने वक्फ मंडळ हे एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भूसंपादन करताना प्रार्थनास्थळे सुरक्षित ठेवण्याची मागणी झाली, त्यासाठी १९१३ मध्ये पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ मंडळ बनले. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित राहण्यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले.

यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी आमदार शिरीष कोतवाल, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घालावी

भाजपला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी अभिमान असेल तर, महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई करावी, गोळवलकर गुरुजी लिखीत ‘बंच ऑफ थॉटस’ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते, प्रशांत कोरटकरनेही महाराजांचा अपमान केला, आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरु आहे. पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉटस’ या पुस्तकातही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील लिखाण केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘देशातील सध्याची व्यवस्था कवाडे बंद करणारी’

केंद्र आणि राज्य सरकारकडून संधी बंद केल्या जात आहेत. परंपरा, संस्कृतीचे दरवाजे बंद करुन समोर वेगळेच वाढून ठेवले जात आहे. देशातील आजची व्यवस्था कुठेतरी कवाडे बंद करणारी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

रामनवमीचे औचित्य साधत सपकाळ यांनी संविधान हाती घेऊन श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्याची सौहार्दता लयास गेली आहे. काँग्रेस सद्भभावना यात्रा काढून सौहार्दता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. श्रीराम हे सर्वांचे आहेत. श्रीरामाचे छायाचित्र संविधानात आहे. यातील समतेचा. बंधुत्वाचा विचार सगळीकडे नांदला पाहिजे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा कार्यक्रम स्वीकारला आहे. त्यांनी मुस्लीम समाजाचा विश्वासघात केल्याच्या विधानावर आपण ठाम असून त्यांना आरसा दाखविल्याने चिडून आपल्यावर व्यक्तिगत टीका केल्याचे सपकाळ यांनी नमूद केले. राज्यातील शेतकऱ्याला संकटातून वाचविण्यासाठी काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खासदार डाॅ. शोभा बच्छाव आणि शेकडो कार्यकर्त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.