जळगाव : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेंतर्गत १४ जुलैला दुपारी २.३५ ला आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यासाठी एलव्हीएम-३ लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला, तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरेल. या मोहिमेमध्ये खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील हातेड या छोट्याशा गावातून इस्त्रोपर्यंत पोहोचणारे संजय गुलाब देसर्डा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे ६१५ कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे ५० दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. या मोहिमेत चांद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल; जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचे स्थान निश्‍चित केले जाईल. इथेच रोव्हर चंद्राच्या या भागात कोणती खनिजे आहेत? पाणी आहे का? आदींचा शोध घेईल, असे संजय देसर्डा यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जळगाव : दुचाकी फिरविण्यास न मिळाल्याने चोरीचा मार्ग; अल्पवयीन दोघांची कबुली

मूळ हातेड येथील राहणारे व चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण झाले. या यानासाठी त्यांनी द्रवरूप इंधनावर काम केले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मोहिमेसाठी कार्यरत होते. अवकाशात सोडल्या जाणार्‍या तीन प्रकारच्या यानांसाठी इंधन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि शुक्रवारी प्रक्षेपित झालेल्या यानात एलव्हीएम-३ मध्ये द्रव (लिक्विड) इंधन लागत असते. यात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून इस्त्रोकडून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

हेही वाचा >>> नाशिक : रोजगार मेळाव्यात उमेदवारांना ढिसाळ नियोजनाचा अनुभव

यापूर्वी संजय देसर्डा यांनी मंगळयान, चांद्रयान-२, चांद्रयान-३ याव्यतिरिक्त अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. चांद्रयान मोहिमेसाठी हातेड येथील सुपुत्राचे परिश्रम व बुद्धीची कामगिरीसाठी मोलाची भूमिका पार पाडता आली, याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतवासियासाठी आहे. जळगाव येथील जैन फार्म फ्रेश फूडस्च्या करारशेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, प्लास्टिक पार्कच्या कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसर्डा आणि जैन फूड पार्कमध्ये कार्यरत छगनमल देसर्डा यांचे संजय देसर्डा हे पुतणे असून, या त्यांच्या सहभागाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपनीच्या विस्तारित कुटुंबातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

हातेड ते इस्त्रो खडतर प्रवास…

संधी प्रत्येकाला मिळत असते; परंतु संधीचे सोन्यात रूपांतर करणे फार कमी लोकांना जमते. संजय गुलाबचंद देसर्डा यांचा जन्म हातेडच्या देसर्डा परिवारात झाला. शालेय शिक्षण हातेडच्या सरकारी शाळेत झाले. नंतर त्यांना अभियांत्रिकीमध्ये अधिक रस असल्याने फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. उच्चशिक्षण घेण्याची तीव्र इच्छा व लाभलेली प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि देसर्डा परिवाराने दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी- वाराणसी म्हणजे बनारस हिंदू विद्यापीठातून एम. टेक पदव्युत्तर शिक्षण घेत असताना २००३ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इस्त्रोची समिती आली आणि त्यात संजय देसर्डा यांची निवड झाली.

ऑगस्ट २००३ मध्ये नियुक्ती झालेले संजय देसर्डा यांच्याकडे इस्त्रोकडून विविध जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या होत्या. त्या त्यांनी यशस्वी पार पाडल्या आहेत. जसे भारतातील इस्त्रो आहे, तसेच पॅरिस येथील केनेस नावाची रॉकेटमध्ये काम करणारी संस्था आहे. त्यासाठी आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. याशिवाय, टीम एक्सलन्स पुरस्कारानेही संजय देसर्डा यांचा गौरव झाला आहे. हातेड ते इस्त्रो हा प्रवास आपल्यासाठी अनुभवांनी भरलेला होता, असे संजय देसर्डा म्हणतात. संजय यांच्या परिवारात त्यांची पत्नी सौ. चित्रा या गृहिणी आहेत, मोठी कन्या ऊर्जा आणि लहान मुलगा आयुष हा बारावीमध्ये असून, तोदेखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शास्त्रज्ञ म्हणून आपले करिअर करणार, अशी त्याची इच्छा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hated son plays a vital role for chandrayaan 3 scientist sanjay desarda ysh
Show comments