आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ात पोल्ट्री उद्योगाशी निगडित विविध प्रश्न आहेत. या परिसरात जवळपास २५ लाखांहून अधिक पक्ष्यांचे संगोपन केले जाते. पोल्ट्री फार्ममध्ये हजारो आदिवासी महिला व पुरुष काम करतात. पोल्ट्रीत पक्ष्यांच्या आरोग्याची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते, तशी कामगारांच्या आरोग्य प्रश्नांबाबत घेतली जात नाही. या जिल्ह्य़ातील नागरिकांशी निगडित आरोग्याचे प्रश्न गुंतागुतींचे आहेत. शासकीय यंत्रणेला पोल्ट्री व्यावसायिकांचे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार होते, तर बर्ड फ्लूमुळे हा उद्योग सावरला नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या एकंदर स्थितीवर या क्षेत्राशी निगडित घटकांशी केलेली बातचित..

रोजगाराची निकड

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला १२० ते १५० रुपयांने दिवसाची मजुरी मिळते. आम्ही खाद्य तयार करणारी मंडळी आहोत. आम्हाला व्यावसायिक सर्व काही साहित्य पुरवत असल्याने पोत्याप्रमाणे मजुरी मिळते. त्यात काही वेळा कमी जास्त होत, पण पोटापाण्याचा प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. कोंबडय़ांचे खाद्य बनविताना मका, ज्वारी, सोयाचे बारीक कणांचा धुराळा उडतो. त्या स्थितीत काम सुरू ठेवावे लागते. डोळ्यात काही वेळा कण गेला की चुरचुर होते. शिंका सुरू होतात.

राम शर्मा (कामगार)

 

पक्ष्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी

आपल्या पोल्ट्रीत ५० हजारांहून अधिक कोंबडय़ा असून त्यांचे संगोपन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कॅलिफोर्निया पद्धतीने त्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्या कोंबडीला काही आजार असल्याचे लक्षात आले की तिला बाहेर काढले जाते. जेणेकरून हा संसर्ग दुसऱ्यांना होणार नाही. यासाठी वेळोवेळी खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. त्यात लसीकरणासह औषधे दिली जातात. तसेच कोंबडय़ांना मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, शिंपले, औषधी घटक वापरून जे अन्न दिले जाते, त्याची तपासणी तज्ज्ञांकडून केली जाते. जेणेकरून मात्रा कमी जास्त आहे का, याचा अंदाज घेतला जातो. याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम अंडय़ावर होणार असतो.

गुलाम वोहरा (संचालक, वोहरा पोल्ट्री फार्म )

 

आरोग्यविषयक प्रश्न गुंतागुंतीचे

नंदुरबार, नवापूर हा परिसर आदिवासीबहुल असल्याने या ठिकाणी आरोग्यविषयक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. रुग्णालयात येणारा वयोगट हा साधारणत: ० ते ६६ असला तरी त्यात युवा वर्गाचे प्रमाण दखल घेण्यासारखे आहे. रक्ताक्षय, सिकलसेल या आजारांसह कुपोषण, दमा, रक्तदाब आदी त्रासांनी ही मंडळी त्रस्त आहे. सिकलसेल व रक्ताक्षय जनुकीय आजार असला तरी अन्य आजार हे व्यवसायाने आलेले आहेत. कमी वयात लग्नामुळे कुपोषण, गुंतागुंतीचे बाळंतपण, कुक्कुटपालनासह वीटभट्टीवरील काम अशा उद्योगामुळे श्वसनाचे विकार जडत आहेत. इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत त्वचारोग (कुष्ठरोग) प्रमाण लक्षणीय आहे.

डॉ. रघुनाथ भोये (जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार)

 

कामगारांची शासकीय रुग्णालयांकडे पाठ

पोल्ट्री व्यवसायात काम करणारे कामगार कोणताही त्रास झाला तरी सहसा सरकारी रुग्णालयांमध्ये येत नाही. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचा तपशील नोंदविला जातो. यामुळे त्या आजारामागील कारणांची चौकशी केली जाऊ शकते. यामुळे व्यावसायिक कामगारांना येथे न आणता गावातील एका धर्मार्थ दवाखान्यात नेतात. रुग्णांना सांधेदुखी, पित्त, अस्वच्छतेमुळे होणारे आजार, दमा, नेत्रविकार संभावतात. मात्र त्याचा सखोल अभ्यास करता आलेला नाही.

डॉ. अविनाश मावची (उपजिल्हा रुग्णालय, नवापूर)

 

प्रबोधन होणे गरजेचे

बर्ल्ड फ्लूच्या संकटावेळी अशिया खंडात अग्रेसर असणारा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सध्या कोलमडला आहे. आर्थिक दुष्टचक्र भेदण्यास अनेकांना अडचणी आल्या. ५० वर्षांहून अधिक काळ आपण या व्यवसायात आहे. बर्ल्ड फ्लूनंतर प्रत्येक घटक  आजाराच्या भीतीने हादरला आहे. याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. कोंबडय़ांना दिले जाणारे खाद्य, लसीकरण याचा परिणाम मांस, अंडीवर होत नाही. आपल्या आहार पद्धतीत कोणतेही अन्न ४० अंशावर तापविले जाते, उकळले जाते. त्यामुळे त्यात कोणतेही जिवाणू राहू शकत नाही.

आरिफ पालावाला (अध्यक्ष, पोल्ट्री फार्म संघटना, नवापूर)

Story img Loader