नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण आणि अभ्यास मंडळांवरील सदस्य निवडीकरीता निवडणुकीच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकतींवर कुलगुरूंसमोर सुनावणी होणार आहे.
विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळावरील सदस्य यांच्या निवडीसाठी प्रत्येकी पाच वर्षांनंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते, असे विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांतून विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची निवडणूक प्रक्रियेव्दारे निवड करण्यात येते. यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्या विद्यापीठाच्या एमयूएचएस डाॅट एसी डाॅट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्यातील तरंगत्या दवाखान्यांची अंतिम घटका, देखभालअभावी धोकादायक स्थितीत
प्राथमिक मतदार यादीतील विहित मुदतीत प्राप्त हरकतींवर कुलगुरू यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येईल. त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. सुनावणीचा निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक वेळापत्रक व अंतिम मतदार याद्या हरकतींवरील सुनावणीनंतर स्वतंत्र्यरित्या जाहीर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठ निवडणूक कक्षास ०२५३-२५३९१५१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.