लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून अधिसभेसाठी (सिनेट) नाशिक विभागातून प्रदीप भाबड विजयी झाले आहे.
विद्यापीठ अधिसभा व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निकाल जाहीर केला. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) राज्यातील सहा महसूल विभागात निवडणूक घेण्यात आली, यामध्ये मुंबईतून राजेश डेरे, पुण्यातून सायबू गायकवाड, नाशिकमधून प्रदीप भाबड, औरंगाबादेतून बाळासाहेब पवार, अमरावतीतून राजेश्वर उबरहंडे, नागपूर विभागातून अभय दातारकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
आणखी वाचा- कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जुगाऱ्यांचा हल्ला, पाच पोलीस जखमी
विद्यापरिषदेसाठी प्राचार्य गटात आयुर्वेद आणि युनानी विद्याशाखेतून माणिकराव कुलकर्णी बिनविरोध तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतून अनुपमा पाथरीकर आणि तत्सम विद्याशाखेतून ज्योती ठाकूर विजयी झाले. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी प्राध्यापक वगळता शिक्षक गटात वैद्यकीय विद्याशाखेतून रवींद्र देवकर, दंत विद्याशाखेतून प्रशांत जाधव, होमिओपॅथी विद्याशाखेतून भालचंद्र ठाकरे आणि तत्सम विद्याशाखेतून विश्रांती गिरी हे उमेदवार विजयी झाले.
विद्यापीठ अधिसभेकरीता निवडणूक प्रक्रियेव्दारे राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नाशिक विभागात मतदान घेण्यात आले. यातून सहा प्राध्यापक निवडण्यात आले. याचबरोबर प्रत्येक विद्याशाखेतून एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम मतदान घेण्यात आले आहे. त्यातून अधिसभेकरीता पाच प्राध्यापक वगळता शिक्षक निवडण्यात आले आहेत. विद्यापीठ विद्यापरिषदेकरीता प्राचार्य व अधिष्ठाता यांच्यामधून प्रत्येक विद्याशाखेमधून प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील प्राचार्य करीता मतदान घेण्यात आले आहे. प्रत्येक अभ्यासमंडळाकरीता सहा विभागप्रमुख याप्रमाणे १८ विविध (पदवी व पदव्युत्तर एकत्रित) अभ्यासमंडळाकरीता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी करीता निवडणूक घेण्यात आली.
आणखी वाचा- धुळे जिल्ह्यात पावसाने २९ गावातील शेतकऱ्यांचे नुकसान
डॉ. बंगाळ यांच्या समवेत निवडणूक मतमोजणीच्या कामकाजासाठी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव बबनराव उधाणे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकुलसचिव फुलचंद अग्रवाल आदी तज्ज्ञ व्यक्तींचा तसेच उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, डॉ. संजय नेरकर, डॉ. सुनील फुगारे, ॲड. संदीप कुलकर्णी, अनंत सोनवणे, राजेंद्र नाकवे, संजय कापडणीस, संदीप राठोड यांचा समावेश होता.