महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक विकास करण्यावर भर दिला, विद्यापीठास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी केले. येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर रविवारी निवृत्त झाले. प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांचाही कार्यकाळ संपत आहे. या पाश्र्वभूमीवर शनिवारी विद्यापीठातर्फे डॉ. जामकर आणि डॉ. राजदेरकर यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. जामकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कुलसचिव काशिनाथ गर्कळ उपस्थित होते. आंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार, इंद्रधनुष्य, क्रीडा महोत्सव, इन्क्लुसिव्ह इनोव्हेशन या व्यापक स्वरूपातील कार्यक्रम विद्यापीठाकडे कमी मनुष्यबळ असताना, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी याच्या मेहनतीमुळे यशस्वीरीत्या राबविता आल्याची भावनाही डॉ. जामकर यांनी व्यक्त केली. डॉ. राजदेरकर, डॉ. गर्कळ, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी एन. एस. कळसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विविध संघटना व संस्था यांच्या वतीने प्रा. डॉ. जामकर यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader