प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर दसऱ्याला मंदिर परिसरात होणारी बोकडबळी प्रथा २०१७ पासून बंद करण्यात आली आहे. स्थानिकांकडून मंदिर परिसराबाहेर या प्रथेचे पालन केले जात आहे. आता ग्रामस्थांनी पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी बोकडबळीची केलेली मागणी आणि धोडंबे येथील आदिवासी विकास सोसायटीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा- धुळ्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर; पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’ टाईप आंदोलन
बोकडबळी प्रथा बंदीला भाविकांचा विरोध
शुक्रवारी कळवणच्या मध्यवर्ती इमारतीत प्रांत विकास मिना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिका जाणून घेण्यात आली. बोकडबळीची परंपरा पूर्वीसारखी सुरू ठेवण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. दसऱ्याच्या निमित्ताने सप्तश्रृंग गडावर बोकडबळी देण्याची प्रथा आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रथेच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सलामी (बंदुकीतून हवेत गोळीबार करणे)वेळी छर्रे उडून काही भाविक, देवस्थानचे कर्मचारी जखमी झाले होते. त्यामुळे देवस्थान ट्रस्टमार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथा बंद करण्यात आली. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही काढले होते. तेव्हादेखील ग्रामस्थ व भाविकांनी या निर्णयास विरोध दर्शविला होता. मात्र आदेश धुडकावला तर गुन्हे दाखल करण्यात येतील. असा इशारा प्रशासनाने दिल्याने ग्रामस्थांनी त्यावेळी गावाबाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेत बोकडबळी केला होता. तो आजही सुरू आहे.
हेही वाचा- नाशिक : इंधन प्रकल्पाजवळील नदीतील पाण्याला फेस; शेत पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
ग्रामस्थांकडून बोकडबळी प्रथा सुरु करण्याची मागणी
देवस्थान ट्रस्टच्या आवाराबाहेर बोकडबळी करण्यात आजही हरकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी कळवण तालुका प्रशासन आणि ग्रामस्थ, भाविक यांच्यात बोकडबळी होऊ द्यावे, जुन्या परंपरेला खंडित होऊ देऊ नका, अशी पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. बैठकीत उपस्थित सर्वांची भूमिका जाणून घेत प्रांत विकास मिना, तहसीलदार बंडू कापसे यांनी बंदी तूर्त तरी कायम ठेवली आहे. बैठकीला नांदुरी, गड येथील सरपंच, व्यापारी,पुरोहित, जनहित याचिकाकर्ते,स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.