नाशिक – उद्योग सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे अद्यापही फरार आहे. जिल्हा सत्र न्यायालयात गर्गे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून शनिवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला लाचलुचपत विभागाने विरोध दर्शविला आहे. तपास कामात गर्गे कुटुंबीय सहकार्य करत नसल्याची तक्रार केली आहे.
हेही वाचा – नाशिक : मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात, गैरप्रकार रोखण्यासाठी ४४ भरारी पथके
घटना घडल्यापासून गर्गे फरार आहेत. त्यांच्या मुंबई येथील घराची तपासणी बाकी असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. मुंबईची मालमत्ता गोठविण्यात आली असली तरी घराची तपासणी बाकी आहे. याविषयी पहिल्यांदा मुलांच्या परीक्षेचे कारण देत एक दिवसाचा कालावधी मागण्यात आला. त्यानंतर गर्गे यांच्या पत्नी प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाल्या. मुंबईतून त्या पुण्यात माहेरी निघून गेल्या. मुलांना गावी पाठवले. भावाला मुंबई येथे घर तपासणीसाठी पाठवले. मात्र त्या व्यक्तीने चावी नसल्याचे सांगितले.