लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सलग तीन दिवसांपासून उंचावणाऱ्या पाऱ्याने मंगळवारी ४१ अंश ही नवीन उच्चांकी पातळी गाठली. नाशिकमध्ये उष्णतेची लाट आल्याची स्थिती असून उन्हाच्या तडाख्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. उन्हाचे अक्षरश: चटके बसत असल्याने दुपारी प्रमुख रस्ते व बाजारपेठा ओस पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा परिणाम आर्थिक उलाढाल मंदावण्यात झाल्याचे चित्र आहे.

थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या तापमानात मागील काही वर्षात वाढ होत आहे. गतवर्षी तापमानाने ४२ अंश या सर्वोच्च तापमानाची नोंद केली होती. यंदा तो उच्चांकही मोडीत निघतो की काय, अशी स्थिती आहे. एप्रिलमध्ये तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला. तीन दिवसांपासून पारा ४० अंशांच्यावर आहे. मंगळवारी त्याने ४१ अंश या हंगामातील नवीन उच्चांकी तापमानाची नोंद केली. तीव्र उन्हामुळे घराबाहेर पडणे वा रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. सध्या शेतात उन्हाळी कामे सुरू आहेत. या वातावरणाचा शेतकरी, मजूर आणि रस्त्यावर काम करणाऱ्यांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी शेतीची कामे सकाळ आणि सायंकाळी केली जात आहे.

सकाळी अकरापासून उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी मुख्य चौक, रस्ते आणि बाजारपेठांतही शुकशुकाट पसरतो. दुपारी चारपर्यंत अशी स्थिती असते. त्यामुळे यावेळी थंडपेय, आईस्क्रिमची दुकाने, फ्रिज, वातानुकुलीत उपकरणांची दुकाने वगळता इतरत्र ग्राहक वर्ग अंतर्धान पावल्याचे दिसून येते.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघाताच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन), चक्कर येणे, पुरळ येणे असा त्रास होतो. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान १५ मिनिटांत १०६ अंशांपर्यंत चढू शकते. या काळात सातत्याने पुरेसे पाणी पिणे महत्वाचे असते. दुपारी कष्टाची कामे टाळणे. दिवसा बाहेर पडताना डोके झाकून ठेवणे, अशाप्रकारे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यसेवा विभागाने केले आहे.