प्रवाशांनी दक्षता घेण्याचे आवाहन

नाशिक : उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने जिल्ह्य़ातील बस स्थानकांमधील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन बस स्थानक परिसरात तसेच बस प्रवासात प्रवाशांकडील दागिने, रोख रक्कम चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अवघ्या दोन दिवसात प्रवाशांकडून दोन लाखाहून अधिक किंमतीचे दागिने, रोख रक्कम लंपास चोरटय़ांनी लंपास केली आहे. प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य परिवहन आणि पोलिसांनी केले आहे.  प्रवाशांचा विश्वास संपादन करून त्यांना बोलण्यात अडकवून तर काही वेळा त्यांच्या बेसावधपणाचा फायदा घेत चोरटे मौल्यवान वस्तूंची चोरी करत आहेत.

जळगावच्या चित्रा गोपाळे (२०) यांच्याकडील ७० हजार रुपयांचे दागिने राजापूर ते नांदगाव या बस प्रवासात चार अनोळखी महिलांनी लंपास केले. दुसऱ्या घटनेत, मंगला बोरसे (५५, रा. पारोळा) या काही कामानिमित्त गावी आल्या होत्या. कोपरगाव आगारातून शिर्डी ते इंदूर बसमध्ये बसत असतांना चोरटय़ाने बोरसे यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची चार पदरी सोन्याची साखळी आणि इतर दागिने चोरून नेले. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत, मीना सूर्यवंशी (रा. सटाणा) या सटाणा ते कंधाणे बसमधून प्रवास करत असतांना सूर्यवंशी यांच्या खांद्यावर अडकवलेल्या पिशवीत रुमालात बांधून ठेवलेले मंगळसूत्र, ६२ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने, एक तोळ्याचे पदक, सहा ग्रॅम वजनाचे कर्णफुले, एक तोळा वजनाचे कानातील झुंबर व काप असा एक लाख, ६२ हजार रुपयांचे दागिने चोरण्यात आले. याशिवाय गर्दीतून पाकिटे चोरण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.

Story img Loader