लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी, मात्राण या नद्यांसह इतर नदी-नाल्यांना पूर आले. रसलपूर, रमजीपूर, खिरोदा या गावांना सर्वाधिक तडाखा बसला आहे.

रावेर तालुका हा मध्य प्रदेशाच्या सीमेलगत आहे. त्यात रावेर तालुका आणि मध्य प्रदेशात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सुकी धरण पूर्णक्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. रात्री रावेर शहरातून, तसेच अभोडा येथून गेलेल्या नागझिरी नदीला मोठा पूर आला. रात्री दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी नदी, मात्राण नदी, रसलपूर येथील नदीला पूर आला आहे. अभोडा येथील नदीच्या पुरात दोन जण वाहून गेले. त्यांपैकी एकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी हाती लागला. बाबूराव बारेला (५०, मोरव्हाल, ता. रावेर) असे मृत झालेल्याचे नाव आहे. रावेर शहरातील फुकटपुरा येथील रहिवासी इक्बाल सत्तार कुरेशी (५६) यांचा नागझिरी नदीत बुडून मृत्यू झाला. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते, ती दुचाकी मिळून आली असून, त्यातील एकाचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. रसलपूरमध्ये मोटार वाहून गेली असून, त्यातील प्रवाशांनी उडी घेतल्याने सुदैवाने ते सर्व बचावले आहेत.

आणखी वाचा-हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडून विसर्ग, तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

रमजीपूर, रसलपूर, खिरोदा या गावांमध्ये नदीकाठच्या अनेक घरांसह दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे संसारोपयोगी साहित्यांसह दुकानांतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. २००६ मध्येही अशीच परिस्थिती झाली होती. घरांमध्ये कंबरेएवढे पाणी साचले होते. ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. गावाच्या पुनर्वसनाची प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावावी, तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईपोटी शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रमजीपूरमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे चार गुरे, तर खिरोदा येथील १० ते १२ गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पुराच्या पाण्यात दहा बकरी, नऊ गायी आणि एक म्हैस वाहून गेली आहे, तर १४५ घरांची पडझड झाली आहे.

प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा

तहसीलदार बंडू कापसे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मदतकार्य केले. रावेर शहरात माजी नगरसेवक सूरज चौधरी यांच्याकडून सहकार्‍यांसह महसूल प्रशासनास सहकार्य केले जात आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे, तर रमजीपूरमध्ये सरपंच प्रकाश तायडे, उपसरपंच योगिता कावडकर, प्रा. उमाकांत महाजन हे ग्रामस्थांना सहकार्य करीत आहेत.