दुपारनंतर पुन्हा स्फोट
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे स्वरूप इतके भीषण आहे की, तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक महानगरपालिका, विविध नगरपालिकांसह देवळाली लष्करी छावणीतून अग्निशमन दलांचे सुमारे २५ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दुपारपर्यंत ११ गंभीर जखमींना बाहेर काढण्यात आले. उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असताना रासायनिक टाक्यांचे पुन्हा स्फोट होऊन संपूर्ण कारखाना आगीच्या कचाट्यात सापडल्याने पाण्याचे बंबही या परिसरातून सुरक्षितस्थळी न्यावे लागले. नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव येथे जिंदाल समुहाचा पॉलीफिल्म निर्मितीचा हा कारखाना आहे. सुमारे साडेपाच एकर क्षेत्रातील हा प्रकल्प पॉलीफिल्म निर्मितीचे जगातील सर्वात मोठे केंद्र म्हणून ओळखला जातो. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कारखान्यातील एका रासायनिक बॉयलरचा स्फोट झाला आणि आग भडकली. अनेकांना सुरक्षितस्थळी जाण्याची संधी मिळाली नाही.
हेही वाचा >>> मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनीला भीषण आग
आगीचे लोळ अतिशय दूरवरून दिसत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. दुर्घटनेवेळी कारखान्यात ५० ते ६० कामगार असण्याची शक्यता वर्तविली जाते. आगीचा रौद्रावतार पाहून नाशिक महापालिका, एमआयडीसी, आसपासच्या नगरपालिका, लष्करी छावणी मंडळ अशा सर्व भागातून अग्निशमन दलासह पाण्याचे बंब मागविण्यात आले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे हे देखील सिल्लोड दौऱ्यावर न जाता मुंढेगावकडे रवाना झाले. कारखान्यातून दुपारपर्यंत ११ गंभीर जखमी अवस्थेतील कामगारांना रुग्णालयात रवाना करण्यात आले.
हेही वाचा >>> नंदुरबार: बांधकाम मजुरांच्या वाहनाला अपघात; दोन महिलांचा मृत्यू
अद्याप आगीत किती जण अडकले आहे, याची स्पष्टता झालेली नाही. कारखान्याच्या बाहेर २० ते २५ रुग्णवाहिकांचा ताफा तैनात आहे. आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात असताना दोन वाजेच्या सुमारास कारखान्यातील काही टाक्यांचे पुन्हा स्फोट झाले. काही वेळातच संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे बंब आवारातून बाहेर नेले. बचाव कार्यातील पथकांना बाहेर काढून कारखान्याच्या सभोवतालचा परिसर मोकळा करण्यात आला.