धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यास सोमवारी सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपिटीमुळे तासाभरात रस्ते आणि शेतशिवार बर्फाच्छादित झाले. रविवारी शिंदखेडा तालुक्यातील बहुतेक भागात बेमोसमी पावसाने पिके आडवी झाली होती.
दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांना फटका बसला असताना धुळे जिल्ह्यातही अवकाळीचे गारांसह आगमन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सोमवारी सायंकाळी प्रचंड वारा आणि ढगाळ वातावरण झाले. गारवा निर्माण झाल्यानंतर हलक्या सरी कोसळू लागल्या. साक्री तालुक्यात वादळ वाऱ्यासह गारपीट सुरु झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने खोरी, टिटाने आणि निजामपूर भागात अधिक गारपीट झाली. गारपिटीत झालेल्या नुकसानीचा अंदाज लगेच आलेला नाही.