नाशिक: गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असताना मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर परिसरास  तडाखा दिला. अवघ्या तासाभरात २८.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. अनेक रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. वादळी वाऱ्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. गणेशोत्सवासाठी सजलेल्या बाजारपेठेत अकस्मात आलेल्या पावसाने विक्रेत्यांसह ग्राहकांची तारांबळ उडवली.

यंदाच्या हंगामात जुलैच्या मध्यापासून शहरासह जिल्ह्यास अनेकदा पावसाचा तडाखा बसला आहे. मध्यंतरी अवघ्या तासाभराच्या पावसाने शहरात दाणादाण उडवली होती. त्याचीच काहिअंशी पुनरावृत्ती मंगळवारी झाली. विजांच्या कडकडाटासह दुपारी अडीचच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. तासाभरात २८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. पावसाचा जोर इतका होता की काही मिनिटांत रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. सखल भागात पाणी साचले. वाहनधारकांना मार्गस्थ होताना तारेवरची कसरत करावी लागली. खड्डे आणि पाण्यामुळे अनेक चौकात काही काळ वाहतूक कोंडी  झाली. गंगापूर रोड भागात भागात एक ते दीड तास वीज पुरवठा खंडित झाला.

Story img Loader