नाशिक – जिल्ह्यातील देवळा, कळवण, येवला, मालेगाव, दिंडोरीसह आसपासच्या भागात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. येवल्यातील पांजरवाडी येथे तर, देवळ्यातील मुलूखवाडीसह परिसरात जोरदार पाऊस झाला. परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. शेतातील बांध फुटून पाणी वाहू लागले. सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र होते. असा पाऊस कधी आयुष्यात पाहिला नसल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. नांदगाव तालुक्यात एकाला विजेचा धक्का बसला तर, वीज कोसळून पशूधनाचे नुकसान झाले. निवाने बारीत दरड कोसळून बंद झालेला रस्ता ढिगारा हटवून खुला करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून सोमवारी दुपारनंतर अनेक भागात तो कोसळला. दिंडोरीत तीन ते चार तास मुसळधार पाऊस झाला. मालेगाव, देवळा, कळवण तालुक्यात तशीच स्थिती होती. खर्डे येथे पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, छोटे, मोठे ओहळ, नाल्यांना पूर आला. मूलूखवाडीसह परिसरात ढगफूटी सदृश्य पाऊस झाला. यावेळी निवाने बारी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ढिगारा हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी नंतर खुला केला. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मुलुखवाडी येथील पाझर तलाव पूर पाण्याने भरून गेला. पावसाने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेतातील बांध फुटल्याने शेतीचे नुकसान झाले.

हेही वाचा >>>संत निवृत्तीनाथ दिंडीत पोलीस आयुक्तांचा सहभाग

देवळ्यासारखीच स्थिती येवला तालुक्यातील पांजरवाडी भागात होती. असा पाऊस कधी आयुष्यात पाहिला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भगतवस्ती ते देवरेवस्ती भागात पावसाने संपूर्ण शेती पाण्याखाली बुडाली. शेतातील बांध फुटून पाणी वहात होते. जमीन खरडून निघाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. आसपासच्या भागात पावसाचा जोर इतका नव्हता. मालेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. निफाडमध्ये मध्यम तर सिन्नरमध्ये त्याचे रिमझिम स्वरुप होते. नांदगाव तालुक्यात सोनू गोटे यांना विजेचा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती आहे. या तालुक्यातील जामदरी येथे भिलाजी तांबे यांच्या दोन बकऱ्या आणि एक मेंढी वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडल्या.