जळगाव – वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता शहरात आता सकाळी सहा ते ११ तसेच दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी चार तसेच रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेतच अवजड वाहने शहरात प्रवेश करू शकणार आहेत. म्हणजेच दिवसा केवळ पाच तास अवजड वाहने शहरात प्रवेश करु शकतील. त्यासंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

काही दिवसांपासून जळगाव शहरात वाहन अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अवजड वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघातच वाढलेत असे नव्हे तर, वादविवादही वाढले आहेत. वाढत्या वाहतुकीमुळे एखाद्या वाहनाचा दुसऱ्या वाहनाला किरकोळ धक्का लागला तरी वाद होऊन बऱ्याचवेळा परिस्थिती हाणामारीपर्यंत येते.

शिवाय, वाहतूक कोंडी होते, ती वेगळीच. या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून कायम करण्यात येत होती. ही स्थिती लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वेळेची मर्यादा निश्चित करून नवी नियमावली काही दिवसांपूर्वी लागू केली होती.

या अधिसूचनेचा मसुदा शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या आत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून या नियमावली विषयीच्या हरकती किंवा सूचना सादर केल्या जाऊ शकतात, असे म्हटले गेले होते. त्यानुसार दाखल झालेल्या सूचनांची दखल घेऊन अवजड वाहनांच्या जळगाव शहरातील प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी दवाखाने, न्यायालय, बँका आणि मुख्य बाजारपेठ, अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहतुकीवर मोठा ताण येत असतो. विशेषतः आकाशवाणी चौक ते रेल्वे स्थानक दरम्यानच्या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम असते.

यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नवीन वाहतूक नियमावलीनुसार, आकाशवाणी चौक ते रेल्वे स्थानक आणि लालबहादूर शास्त्री टॉवर चौक ते नेरी नाका चौक या प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.