शहरात चालू वर्षात हेल्मेट न वापरल्याने ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून २६१ वाहनधारक गंभीररित्या जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे अपघाताच्या कारणाच्या विश्लेषणात स्पष्ट झाले. हेल्मेटअभावी होणारे अपघात, त्यातील प्राणहानी व जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी एक डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>>नाशिक: साखळचोंड दरीत पडून विद्यार्थ्याचा म़ृत्यू
मागील एक, दीड वर्षात हेल्मेट सक्तीसाठी अवलंबिलेले मार्ग वादाचा विषय ठरला होता. हेल्मेट नसल्यास पंपावर पेट्रोल देण्यास प्रतिबंध, कुणी हेल्मेटधारक दुचाकीला पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर कारवाई, शासकीय कार्यालये व महाविद्यालयात विना हेल्मेट वाहनधारकास प्रवेश दिल्यास थेट प्रमुखावर कारवाई हे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यास विरोध होऊनही तत्कालीन पोलीस प्रमुखांनी अमलबजावणीचा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर, नव्याने लागू होणारी हेल्मेट सक्ती तितकी कठोर नाही. अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आजवर जेव्हा हेल्मेटसक्ती झाली, त्या त्या वेळी अपघात, प्राणांतिक अपघात व जखमींच्या संख्येत घट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>नाशिक-बेळगाव विमानसेवा लवकरच पूर्ववत
हेल्मेट परिधान न करता वाहन चालविल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर गस्त घालणे सुरू केले आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघातात बऱ्यापैकी घट झाल्याचा दावा केला जात आहे. शहरातील सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एक डिसेंबरपासून हेल्मेटच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. हेल्मेट वापरण्यासाठी शहरात कायमच जनजागृती केली जाते. त्यात विविध संस्था, संघटनांनाही सामील करुन घेतले जाते.
हेही वाचा >>>एकनाथ शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती – गुलाबराव पाटील यांच्याकडून पाठराखण
दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर कायद्याने बंधनकारक आहेच. पण, वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने ते तितकेच महत्वाचे आहे. शहरवासीय कायदा सुव्यवस्थेचे स्वयंस्फुर्तीने पालन करतात. त्यामुळे सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. तथापि दुचाकीस्वारांचे अपघात, त्यातील मृत्यू व जखमी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलिसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते.- जयंत नाईकनवरे (पोलीस आयुक्त, नाशिक शहर)