तीन मुलांनी २ हजार ४०१ रुपये जमविले
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून विविध संस्था, संघटना, उद्योगपती त्यासाठी पुढाकार घेत आहेत. शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी लहान मुलांनीही पुढाकार घेतला असून त्याचे प्रत्यंतर देवळा येथील बाजारात दिसून आले. आठवडे बाजारात फिरून तीन लहान मुलांनी शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी निधी जमा केला.
बाजारात २४०१ रुपयांची मदत जमा करून देशाप्रति असलेले आपले प्रेम व्यक्त केले. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव लहान मुलांनाही झाली आहे. त्यामुळेच सार्थक आहेर, विशाल आहेर, अरूष आहेर हे देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथील चिमुकले जवानांच्या मदतीसाठी देवळा येथील आठवडे बाजारात हातात डबा घेऊन फिरले. मोठय़ांकडे त्यांनी जी शक्य असेल ती मदत करण्याची अपेक्षा केली. त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारातील भाजीपाला, किराणा विक्रेत्यांकडून २४०१ रुपयांची मदत या चिमुकल्यांनी जमा केली.