शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारी करता याव्यात, यासाठी बळीराजा ही मदतवाहिनी कार्यान्वित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आर्थिक गुन्हे शाखा यासंदर्भातील तक्रारी जमा करत यावर काम करत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीचा आकडा ४२ कोटींच्या घरात आहे. यातील एक कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात यश आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा उत्पादकांची बऱ्याचदा परप्रांतीय तर, कधी स्थानिक व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाला पैसे देण्याचा वायदा होतो. परंतु, आश्वासन न पाळता संशयितांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांच्या बांधावर द्राक्ष खरेदीच्या वेळी भाव, वजन अशा वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असते. शेतकऱ्यांची होणारी ही अडवणूक लक्षात घेता याआधी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यानंतर काही काळ काम थंडावले. मात्र मागील आठवड्यात कृषि मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा शेतकरी फसवणुकीचा विषय चर्चेत आला.
हेही वाचा >>> नाशिक खड्डेमुक्त करण्याची सूचना; मनपा आयुक्तांनी खडसावले
फसवणूक झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नाशिक जिल्हा पोलिसांच्या वतीने बळीराजा ही मदतवाहिनी सुरू करण्यात येत आहे. तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचे तक्रार अर्ज मागवण्यात येत आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १०० शेतकऱ्यांची पोलिसांनी प्रत्यक्ष भेट घेत काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या बैठका घेत प्रबोधन करण्यात येत आहे. याविषयी कृषी, पणन, द्राक्ष बागायत संघ आदींशी पत्रव्यवहार करुन आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> संत कबीरनगर झोपडपट्टीविरोधात जनहित याचिका
परप्रांतीयांना वचक
नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या तक्रारी २०१४ पासूनच्या आहेत. फसवणुकीचा आकडा हा ४२ कोटींच्या घरात आहे. यात संशयितांकडून ९० लाखांहून अधिक वसूल केले आहेत. काही पैसे लवकरच परत मिळतील. परप्रांतीय व्यापारी किंवा अन्य व्यापाऱ्यांना जिल्ह्यात कृषिमालाची खरेदी करायची असेल तर त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी एखादा व्यापारी माल खरेदीसाठी आला तर त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. जेणेकरून त्याची तपासणी करुन त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मिळवली जाईल. या सक्रियतेमुळे फसविण्याच्या उद्देशाने येणारे परप्रांतीय व्यापारी सावध झाले आहेत. – रवी मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)