जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खासदाराची नियुक्ती करण्यावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सामंजस्याने तोडगा काढला आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातील खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सोपविली. जिल्ह्यात दोन खासदारांपैकी एक केंद्रात मंत्री तर दुसरे दोनवेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेच्या आधारावर समितीचे अध्यक्षपद कुणाला द्यायचे, या पेचात यंत्रणा सापडल्या होत्या. डॉ. पवार यांनी हा प्रश्न सोडविल्याने यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.
हेही वाचा- नाशिकमध्ये मद्यधुंद चालकाच्या कारचा भर वर्दळीत धुमाकूळ
खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ते सुरक्षा समितीची पहिलीच बैठक नवनियुक्त अध्यक्ष हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. सुमारे तीन वर्षे या समितीची बैठक झालेली नव्हती. जिल्ह्यात ज्येष्ठ खासदार कोण, हेच निश्चित होत नसल्याने नाशिकसह अनेक ठिकाणी ही समिती आकारास आली नसल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे म्हणणे होते. या तिढ्यावर लोकसत्ताने प्रकाश टाकला होता. रस्ता सुरक्षेवर काम करणाऱ्या जिल्हास्तरावर दोन समित्या असतात. एक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर दुसरी खासदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. अपघातांचे प्रमाण करण्यासाठी नियोजन, अपघात प्रवण क्षेत्रात तातडीचे व दीर्घकालीन उपाय, सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती आदी विषयांवर या समित्या काम करतात. औरंगाबाद रस्त्यावरील बस अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची तातडीची बैठक होऊन अनेक प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आले. खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यासाठी यंत्रणेकडून चाललेले प्रयत्न अखेर दृष्टीपथास आले.
हेही वाचा- झोपडपट्टीधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; नाशिक तालुक्यात तीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस
जिल्ह्यात दोन खासदार असल्यास खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद ज्येष्ठ खासदारास द्यावे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाने म्हटलेले आहे. जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी हे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. दिंडोरीतून प्रथमच निवडून आलेल्या भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार या केंद्रात आरोग्य राज्यमंत्री आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत गोडसे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. दोघांपैकी एक केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे तर, दुसरे राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित. त्यामुळे या दोन खासदारांमध्ये ज्येष्ठ कोण, हे निश्चित करण्यात यंत्रणा बुचकळ्यात सापडली. त्यामुळे राजशिष्टाचार विभाग, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यांनी मंत्रिपदी असलेल्या डॉ. पवार या ज्येष्ठ खासदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे प्रशासनाने डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती गठीत करण्याची तयारी केली होती. मात्र, खुद्द डॉ. पवार यांनी हेमंत गोडसे हे ज्येष्ठ खासदार असून रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यास सुचविले. त्यानुसार प्रशासनाने या समितीची जबाबदारी आता गोडसेंवर सोपविली आहे.
हेही वाचा- मालेगाव: विकास कामांसाठी शिंदे गटावर पालिकेला टाळे ठोकण्याची वेळ
रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदामुळे बैठकीला विलंब होत असल्याचे समजल्यानंतर आपण तात्काळ प्रशासनाशी चर्चा केली. हेमंत गोडसे हे ज्येष्ठ व अनुभवी खासदार आहेत. त्यामुळे त्यांना या समितीचे अध्यक्षपद देण्यास सुचविले. त्यानुसार गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वांना एकत्रित काम करायचे आहे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.