काकीनाडा एक्स्प्रेसमधून १९ किलो गांजा जप्त
चॉकलेटच्या पिशवीचा वापर करून रेल्वेतून गांजाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईतून उघड झाला. चॉकलेटच्या पिशवीत गांजा भरून तो बॅगमध्ये अशा रीतीने ठेवला गेला की कुणालाही ते चॉकलेट्स वाटतील. काकीनाडा- शिर्डी साईनगर एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून दीड लाख रुपये किमतीचा १९ किलो गांजा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थाची अशा मार्गाने तस्करी होत आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अनकाई रेल्वे स्थानकांतून गस्त घालत असताना काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये अनोळखी बॅग असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित गाडीत प्रवेश करून शोध मोहीम हाती घेतली असता बोगीतील स्वच्छता गृहाजवळ चार बॅग सापडल्या. या बॅगा कोणाच्या आहेत, याबाबत प्रवाशांकडे विचारणा केली असता कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गाडी मनमाड रेल्वे स्थानकात आल्यानंतर चारही बॅग ताब्यात घेतल्या. पोलीस ठाण्यात त्याची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. चारही बॅगांमध्ये चॉकलेटच्या प्लास्टिक पिशवीत गांजा भरलेला असल्याचे आढळून आले. त्यात सुमारे १९ किलो गांजा आढळला. रेल्वे सुरक्षा बलाने लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक के.डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भैय्या शेख, आर. ए. शिंदे, एस. एस. घाटोले, असलम शाह, सागर वर्मा, एस.ए. वाणी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.