बर्ड फ्लूचे संकट झेलल्यानंतर नंदुरबार जिल्ह्य़ातील व्यावसायिकांनी आर्थिक गणितांची जुळवाजुळव करत पुन्हा उभे राहण्याची धडपड केली. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी काहीअंशी दक्षता घेतली जात आहे. तथापि, कोंबडय़ांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांमुळे (अॅन्टिबायोटिक्स) मानवी आरोग्यावर परिणाम संभवतात. असे अंश असणारे मांस वा अंडे सेवन केल्यास हृदयावर ताण येऊ शकतो. इतकेच नव्हे तर, स्थूलताही वाढू शकते, असे पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात. फार्ममधील कोंबडय़ांचे नमुने संकलित करून तपासणी होत असली तरी आजतागायत एकाही अहवालात आक्षेपार्ह आढळलेले नाही. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मांस आणि अंडे यांच्या तपासणीची तसदीही घेत नसल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्य़ात बर्ल्ड फ्लूचे संकट येण्यापूर्वी नवापूर परिसरात प्रचंड अस्वच्छता, दरुगधी, घाणीचे साम्राज्य होते. व्यवसायवृद्धी आणि नफा या एकमेव उद्देशातून व्यावसायिकांचा कोंबडय़ा सांभाळण्याचा प्रयत्न होता. यातून एकाचा संसर्ग दुसऱ्याला होऊन सर्वच फार्मवर बर्ल्ड फ्लूचे संकट कोसळले. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी आदेशानुसार तेव्हा सर्व कोंबडय़ा मारून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. फार्म परिसरात हे पक्षी जमिनीत पुरण्यात आले. यातून धडा घेत व्यावसायिकांनी स्वच्छतेचा मंत्र अंगीकारला असून प्रत्येक फार्ममध्ये कोंबडय़ा मेल्या की त्यांना खड्डय़ात पुरण्यात येते. नवापूर तालुक्यात पोल्ट्री फार्मची संख्या २४ आहे. प्रत्येक फार्ममध्ये आठवडय़ात एक-दोन कोंबडय़ा वेगवेगळ्या कारणाने दगावतात. त्याची लक्षणे सुरुवातीलाच लक्षात आल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कामगार त्यांना आधीच बाजूला काढतात. औषधोपचारात प्रतिजैविके अथवा लसीकरणाला कोंबडय़ा प्रतिसाद देत नसतील तर त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण होऊन त्यांचा मृत्यू होतो. पक्ष्यांचा वार्षिक साधारणत: ४ ते ५ टक्के मृत्यू दर असून यापेक्षा अधिक कोंबडय़ा दगावल्यास पशुवैद्यकीय विभागाकडून त्या त्या फार्मची तपासणी होणे गरजेचे आहे.
२००६ नंतर पशुवैद्यकीय विभाग वर्षांत टप्प्याटप्प्यात पोल्ट्री फार्ममधून नमुने घेते. कोंबडय़ांची विष्ठा, लाळ याचे नमुने नाशिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना तसेच भोपाळ येथे पाठविण्यात येतात. मागील दहा वर्षांत एकाही नमुन्यात आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा नंदुरबार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. गावीत यांनी केला. दुसरीकडे, कोंबडय़ांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिजैविकांचा काहीअंशी परिणाम कोंबडय़ांचे मांस आणि अंडी यावर होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरत अन्न व औषध प्रतिबंधक विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु संबंधित विभागाने यातून अंग काढून घेतले आहे. कोंबडय़ांना देण्यात येणाऱ्या औषधांची मात्रा त्यांच्या शरीरात पूर्णत: विरघळत नाही. त्यातील काही अंश हा शरीरात शिल्लक राहिल्याने हा डोस दिल्यानंतर लगेच कोंबडीचा मृत्यू झाला आणि ते मांस सेवन केल्यास हृदयावर ताण येऊ शकतो, तसेच काही औषधांमुळे शरीरातील स्थूलता वाढू शकते.
अंडी हाताळण्याचे काम करताना कामगारांना काही व्याधी जडू शकतात. मेलेल्या कोंबडय़ा शास्त्रीय पद्धतीने पुरण्याऐवजी अनेकांचा कल त्या जाळण्याकडे असतो. पिसे, खराब अंडी उघडय़ावर फेकल्यामुळे त्रास होऊ शकतो. या परिसरात गरोदर महिलांची विशेष काळजी न घेतल्यास ‘सालेमुनेला’ हा तापसदृश आजार होऊन गर्भातील बालकाला किडनी तसेच यकृताला सूज येऊ शकते, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव सादगिरे यांनी सांगितले. दरम्यान, बर्ल्ड फ्लूच्या संकटानंतर स्थानिकांमध्ये सजगता आली आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास हा विषय थेट ग्रामसभेत मांडला जातो. यामुळे उघडय़ावर पोल्ट्रीचा कचरा टाकणे, मेलेल्या कोंबडय़ांची विल्हेवाट, फर्म परिसरातून येणारी दरुगधी याला आळा बसला आहे.
(सीएसई मीडिया फेलोशिप अंतर्गत केलेला अभ्यास)