नाशिक – २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी शहरात दाखल होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच रामकुंडावर गोदावरी पूजनही करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांचा सुमारे दोन किलोमीटरचा रोड शो होईल. युवा महोत्सवाचे उद्घाटन होणारा तपोवन मैदानचा संपूर्ण परिसर रामायणातील प्रसंगांवर आधारीत चित्रांनी सजवला जात आहे. यामुळे युवा महोत्सवाला जणू धार्मिक महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. सुमारे साडेचार हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात रोड शो आणि युवा महोत्सवाचे उद्घाटन हे कार्यक्रम समाविष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आता त्यात काळाराम मंदिरात दर्शन, रामकुंडावर गोदावरी पूजन हे दोन कार्यक्रम नव्याने समाविष्ट झाले. मंदिराचे विश्वस्त आणि आमच्या आग्रहावरून पंतप्रधान कार्यालयाकडून त्यास मान्यता मिळाल्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. नाशिक आणि श्रीराम यांचे वेगळे नाते आहे. काळाराम मंदिराचे ऐतिहासिक महत्व आहे.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी हे रामकुंडावर भेट देऊन जलपूजन करतील, असे त्यांनी नमूद केले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर, गोदावरी काठावरील पूल आणि शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, वाहतूक बेट पाण्याचे फवारे मारून स्वच्छ केले जात आहेत. मध्यवर्ती भागातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. तपोवन मैदान परिसरात रामायणातील प्रसंग, राम दोहे, रामरक्षेतील काही श्लोक चितारल्याने रामनगरीचे रुप प्राप्त झाले आहे. गोदा काठावरील रंगरंगोटीची जबाबदारी कलाशिक्षक व विद्यार्थ्यांवर सोपवली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यासाठी विविध भागातून अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. कांदा निर्यात बंदीवरून आंदोलनाचा इशारा देणाऱ्या शेतकरी संघटनांशी आमची चर्चा सुरू आहे. काही संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे. उर्वरित संघटनांशी बोलणी प्रगतीपथावर आहे.

-संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक)

हेही वाचा : युवा महोत्सव की धार्मिक महोत्सव?

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शहर व परिसरात पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३५० अधिकारी, चार हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या असा मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याचे आयुक्तालयातून सांगण्यात आले.