लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: जिल्हा प्रशासन बालमृत्युबाबत कडक धोरण अमलात आणत असून ज्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक पगारवाढ थांबविणे आणि दुसऱ्यांदा मृत्यू झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत येथे इ आकार डिजिटल कुशल अंगणवाडी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. गावित यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील प्रत्येक गरोदर जोखीम माता आणि आजारी बाळाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता अंगणवाडी सेविकांनी दाखविल्यास मातामृत्यू आणि बालमृत्युचे प्रमाण आटोक्यात आणण्यास मदत होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. पर्यवेक्षिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डाॅ. गावित यांनी दिले. कुपोषित बालक आणि गरोदर माता यांची नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातून आवश्यकता असल्यास तपासणी करुन घेतल्यास त्यांना होणाऱ्या समस्यांचे निराकरण तत्काळ होवून बालमृत्युसारख्या समस्येवर वेळीच फुंकर मारता येईल, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला अटक
कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, महिला व बालविकास अधिकारी राठोड आदी उपस्थित होते. रॉकेट लर्निंग आणि जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विघमाने इ आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.