*तक्रार स्वीकारण्यास पोलीस अधिकाऱ्याची टाळाटाळ
*अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी हिंदुत्ववादी संघटना आग्रही
अल्पसंख्याक समाजातील एका तरुणाने आपल्या मुलीला पळवून नेऊन तिच्याशी बळजबरी विवाह करण्याचा प्रयत्न केल्याबाबतची एका महिलेची तक्रार नोंदविण्यास इंदिरानगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने टाळाटाळ केल्याने बुधवारी वातावरण तंग झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस आयुक्तालय कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
तीन ते चार दिवसांपासून समाज माध्यमांवर वेगवेगळ्या धर्मातील युवक व युवतीच्या नियोजित विवाहाची नोटीस ‘व्हायरल’ झाली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना जाग्या झाल्या. दुय्यम सहनिबंधक कार्यालयात ही नोटीस दिली गेली होती. तत्पूर्वी संबंधित युवक आणि युवतीचे कुटुंबीय यांच्यात वाद झाल्याचेही सांगितले जाते. संबंधित युवतीने विवाहास नकार दिला होता. त्याचा राग आल्याने युवकाने घरी येत मुलासह आपणास मारहाण केली, अशी तक्रार मुलीच्या आईने केली. हे कुटुंबीय या संदर्भात तक्रार देण्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेले असता अधिकाऱ्याने तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट अरेरावी केली, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यशैलीच्या निषेधार्थ बुधवारी हिंदू एकता, विश्व िहदू परिषद, बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात जमा झाले. पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांना निलंबित करावे, मुलीची सुटका करावी, मुलीच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे निवेदन सादर केले.
या घडामोडीनंतर पोलीस यंत्रणेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला. मुलीच्या कुटुंबियांना ती विवाह करणार असल्याची शंका आली होती. कुटुंबियांनी तिला समजावल्यावर तिने या विवाहास नकार दिल्याचे आईचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त युवकाने घरी येऊन मारहाण केली आणि मुलीला पळवून नेले, अशी त्यांची तक्रार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान संबंधित युवकाने आपल्या धर्म पद्धतीनुसार विवाह झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले. या सर्व घटनाक्रमाची पोलीस चौकशी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा