इतिहास कधीही पुसला जाऊ  शकत नाही. त्यामुळेच जालियनवाला बाग हत्याकांडाचे रौद्ररूप आजही पंजाबसह भारतीयांच्या मनावर कायम आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधातील संतापही कायम राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ज्ञ अंजली वेखंडे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसला सैनिकी महाविद्यालयात जालियनवाला बाग हत्याकांड शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वेखंडे बोलत होत्या. महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग आणि इतिहास विभाग यांच्या सहकार्याने प्राचार्य डॉ. यु. वाय. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे १३  एप्रिल १९१९ रोजी इंग्रज ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने हत्याकांड घडविले. जनरल डायरच्या हुकमावरून लष्कराने नि:शस्त्र लोकांच्या सभेवर १,६०० फैरी झाडल्या. सभेत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. अमृतसरमध्ये घडलेली ही घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा कळस होता, असेही वेखंडे म्हणाल्या.

सुसंस्कृतपणाचे लक्षण इतिहास शिकवतो. तो भूतकाळाचा बोधक, वर्तमानाचा सूचक, भविष्यकाळाचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो. अस्मिता जागृत करण्याचे काम इतिहास करतो. जात धर्मापलीकडे राष्ट्रवाद असतो, असेही वेखंडे यांनी सांगितले.  यावेळी व्यासपीठावर वसतिगृहाचे समन्वयक डॉ .एस. आर कंकरेज, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. कुलकर्णी उपस्थित होते. भारतीय इतिहास संकलन समितीचे जयंत भानोसे, के. पी. पंचाक्षरी हेही व्याख्यानासाठी उपस्थित होते. तेजस पुराणिक यांनी आभार मानले.

१० एप्रिल १९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या उपायुक्तांच्या घराकडे जात होता. कारण होते दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु यांच्याविरुद्ध तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला होता. या घोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या इमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँका, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गुरखा रेजिमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाच्या एका युरोपियन रक्षकाला मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपियनाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनीच तिचे प्राण वाचविले. ब्रिटिशांनी दिवसभरात केलेल्या गोळीबारात आठ ते २० जण धारातीर्थी पडले. यानंतर दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबच्या इतर भागात हिंसाचार सुरूच होता. हिंसाचार रोखण्यासाठी अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. त्याच दिवशी ‘बैसाखी’ सण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव सण साजरा करण्यासाठी जालियानवाला बागेत जमले. मार्शल लॉमुळे पाच किंवा जास्त जणांना एकत्र जमण्यास मनाई होती. त्यातूनच जालियनवाला बाग हत्याकांड घडले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History jallianwala bagh hatyakand akp