नाशिक – विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मतफुटीत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे मोठे योगदान होते. दोन दिवसांपूर्वी पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. इगतपुरी हा काँग्रेस विचारधारा मानणारा मतदारसंघ आहे. ज्यांनी पक्ष सोडला ते पराभूत झाले. या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ असून इगतपुरीत पक्षाचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून ये्ईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी काँग्रेसतर्फे इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मतफुटीला त्यांनी पुन्हा एकदा खोसकरांना जबाबदार धरले. इगतपुरीत आधी काँग्रेसच्या निर्मला गावित या आमदार होत्या. त्यांनी पक्ष बदलल्यावर त्या पराभूत झाल्याचा दाखला त्यांनी दिला. या जागेसाठी पक्षाला उमेदवार आयात करावा लागणार नाही. काँग्रेसकडे जवळपास २० इच्छुकांचे अर्ज आले आहेत. जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊन स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्मला गावित या पक्षीय कामासाठी स्वगृही परतल्यास त्यांचे स्वागत असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिक : जिल्हा परिषदेत ८१२ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश

हेही वाचा – नाशिक : आचारसंहितेमुळे फलकबाजीला लगाम

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात कुठलाही वाद नाही. जनतेचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे, याचा प्रत्येक ठिकाणी आधी अंदाज घेतला जाईल. उमेदवाराची निवड नंतर होईल. नाशिक मध्यची उमेदवारी कोणत्याही पक्षाने जाहीर केलेली नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार हे असंविधानिक असून भ्रष्टाचारी, टक्केवारीत त्यांना रस राहिला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. शाळेत लहान मुली सुरक्षित नाहीत. सत्ताधारी पक्षाचे नेते सुरक्षित नाहीत. विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला. देवेंद्र फडणवीस हे आजवरचे सर्वात अपयशी गृहमंत्री असल्याची टीका पटोले यांंनी केली. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनेक सभा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.