एप्रिलच्या सुरुवातीला पावसाचा हलकासा शिडकावा झाल्यानंतर तापमान पुन्हा एकदा उंचावण्यास सुरुवात झाली आहे. प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचली असताना टंचाईचे संकटही गडद झाल्यामुळे दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थाने टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. मार्चपासून वाढणारे तापमान एप्रिलच्या मध्यावर ही उंची गाठते, असा सर्वसाधारण अनुभव. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकची वाटचाल ४० अंशापर्यंत आधीच झाली आहे. जळगावसह मालेगाव, धुळे व नंदुरबार भागात उष्णतेची लाट आल्याची स्थिती आहे. उन्हाच्या तडाख्याने बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणे पसंत केले. यामुळे दुपारी प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार थंडावतात. शासकीय कार्यालयांत दुपारी कामकाजात संथपणा आल्याचे पाहावयास मिळते. जळगाव हा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद होणारा जिल्हा. होळीनंतर या भागातील तापमानात वाढ होते. जळगावसह सर्वत्र उन्हाची झळ एव्हाना बसू लागली आहे. तापमानाने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून केल्या जात आहेत.

रस्त्यावरील वर्दळ कमी होत असल्याने थंडपेय व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही उन्हाच्या झळा कमी होण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे काही विक्रेत्यांनी उसाचा रस, कुल्फी, बर्फाचे गोळे गल्लीबोळात जाऊन विक्री करण्यावर भर दिला आहे. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारची जाळी लावून उष्णता नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. घराच्या मुख्य दरवाजासमोर, अंगणात किंवा बागेत रोपांच्या संरक्षणासाठीही अशा जाळीच्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात आहे. दुभत्या जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठय़ाच्या अवती-भवती धान्याच्या रिकाम्या गोण्यांच्या मोठय़ा चादर बनवून त्या लावण्यात आल्या आहेत. या गोण्यांवर पाण्याचा शिडकावा करून गारवा निर्माण केला जातो. वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तूंच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. तसेच आइस्क्रीम, थंड पेय, कलिंगड यांची मागणी वधारली आहे. पाणी टंचाईचे संकट सर्वत्र भयावह स्वरूप धारण करत आहे. शेकडो गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. शहर व निमशहरी भागात कपातीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या एकंदर स्थितीमुळे पुढील दोन महिने ही स्थिती आणखी वेगळे वळण घेणार असल्याची धास्ती व्यक्त होत आहे.

Story img Loader