सप्तरंगांची उधळण करत पाण्याचे तुषार अंगावर झेलत थिरकत्या गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या पावलांना यंदा पाणीटंचाईच्या संकटामुळे कोरडय़ा रंगावरच समाधान मानावे लागल्याने शहरासह जिल्ह्य़ात रंगपंचमीचा रंग फिका राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काहींनी टिळा होळी तर काहींनी रंगपंचमीच्या नासाडीतून वाचणाऱ्या पाण्याने तृषार्त जनावरांना पाणी देण्यात समाधान मानले. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरासह जिल्ह्य़ात भेडसावणाऱ्या टंचाईच्या पाश्र्वभूमीवर, यंदाच्या रंगपंचमी दिवशी नागरिक काय करतात, याकडे सर्वाचे लक्ष होते. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेसह प्रशासनाने केले होते. त्यास बहुतेकांचा प्रतिसाद मिळाला. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या रहाडी खोदण्यात आल्या नाहीत.

दर वर्षी शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांतर्फे ‘रेन डान्स’ व तत्सम उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र त्यास फाटा देऊन कोरडी रंगपंचमी खेळण्यास प्राधान्य दिले गेले. यामुळे उत्सवप्रेमींचा काही अंशी हिरमोड झाला. नागरिकांनी कोरडय़ा नैसर्गिक रंगाचा वापर करत रंगपंचमीचा आनंद लुटला. बालगोपालांनी मोठय़ांच्या कृतीचे अनुकरण केले.

रंगपंचमीच्या दिवशी तरुणाईच्या उत्साहावर नजर ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणेला करावे लागते. कॉलेज रोड भागात तर मुला-मुलींचे गट दुचाकीवर आनंदोत्सव लुटतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची तरुणाईने काळजी घेतली. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात रंगपंचमी रंगापुरतीच मर्यादित राहिली. रंगपंचमीच्या दिवशी येवला शहरात रंगांचे सामने आयोजित केले जातात.

येवला शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असताना या उत्सवात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सामने रद्द करण्याचा निर्णय आधीच जाहीर करण्यात आला होता. या माध्यमातून वाचविलेले पाणी ममदापूरच्या अभयारण्यातील हरणांसाठी पाठविण्याची व्यवस्था स्थानिकांनी केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदा रंगपंचमी कुठेही साजरी झाली नाही. ग्रामीण भागात सर्वत्र पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही याची सर्व पातळीवर दक्षता घेण्यात आली. रंगाचा टिळा लावून रंगपंचमी साजरी होण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi at nashik