नाशिक – सर्वसामान्यांना स्वप्नातील व वाजवी दरात घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (नरेडको) २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘होमेथॉन २०२३’ या गृह प्रदर्शनाचे आयोजन गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानात करण्यात आले आहे. प्रदर्शनात १५ लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. गुरुवारी सकाळपासून प्रदर्शनास सुरुवात होत असून सायंकाळी पाच वाजता त्याचे औपचारिक उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एनएमआरडीएचे आयुक्त सतीश खडके, सहजिल्हा निबंधक कैलास दवंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
हेही वाचा >>> नाशिक : विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधींचा संप
प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वास गेली असून त्यात नाशिकसह मुंबई, पुणे तसेच विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचाही सहभाग आहे. आपल्या स्वप्नातील घर घेणार्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. नाशिक, मुंबईसह नाशिकमधील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्ता एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना उपलब्ध होईल.,अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. उदघाटन सायंकाळी असले तरी, नागरिकांना सकाळी १० वाजेपासूनच प्रदर्शन खुले होणार आहे. या बाबतची माहिती होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे , सहसमन्वयक शंतनू देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा >>> नंदुरबारमध्ये डीलिस्टिंग मेळाव्यात धर्मांतरीत आदिवासींविरोधात मोर्चा
पाचही दिवस सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. परंतु, प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांना साकेतांकाने (क्यूआर कोड) नोंदणी करावी लागणार आहे. गृह प्रदर्शनाला जास्तीतजास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीची संधी
वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिक ओळखले जाते. धार्मिक, सांस्कृतिक नगरी, वाइनची राजधानी, शैक्षणिक केंद्र, विपूल नैसर्गिक सौंदर्य, अल्हाददायक वातावरण, मुबलक पाणी यामुळे गुंतवणूकीसाठी उत्तम शहर म्हणून नाशिकची निवड केली जाते. प्रदर्शनात गंगापूर रोड, कॉलेजरोड, महात्मानगर, सातपूर, आडगाव, हिरावाडी, गोविंदनगर, काठेगल्ली, नाशिकरोड, पंचवटी, वडाळा, पाथर्डी फाटा, त्र्यंबकरोड, म्हसरूळ आदी भागात गृह खरेदीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे. गतवर्षी होमेथॉनच्या माध्यमातून ३४२ सदनिकांची विक्री करण्यात आली होती. यंदा पाच दिवसीय प्रदर्शनात जागेवर नोंदणी करणार्या प्रत्येक ग्राहकाला चांदीचे नाणे भेट दिले जाईल. प्रदर्शनात घर घेऊ इच्छिणार्या ग्राहकांना विविध बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.
ग्राहकांचा कल विशाल सदनिकेकडे
महामार्ग विस्तारीकरणाने नाशिकहून मुंबई किंवा पुण्याच्या प्रवासाचा वेळ बराच कमी झाला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग, प्रस्तावित सूरत-चेन्नई महामार्गामुळे नाशिक राज्यातील अन्य शहरांसह दाक्षिणात्य राज्यांशी जोडले जाणार आहे. या महामार्गाच्या आसपास स्मार्ट शहरे विकसित होणार असल्याने मालमत्ता, बांधकाम क्षेत्रास सुगीचे दिवस येणार आहेत. त्यामुळे शहरात सदनिका, भूखंड, बंगला, रो हाऊसची मागणी वाढली आहे. या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळू शकेल. नाशिक शहरातही महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित आयटी पार्क, निओ मेट्रो प्रकल्प आणि व्दारका ते नाशिकरोड दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पामुळे नाशिकच्या चौफेर विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून गुंतवणुकीची नामी संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी सांगितले. अलीकडच्या काळात चार ते सात हजार चौरस फुटापर्यंतच्या घरांना पसंती मिळत आहे. सर्व प्रकारच्या घरांना मागणी आहे. झपाट्याने विकसित होणार्या शहरात गुंतवणूकीची संधी नरेडकोने उपलब्ध करून दिल्याचे नरेडकोचे सचिव सुनील गवादे यांनी म्हटले आहे.