धुळे: घर रिकामे करून हवे असल्यास पाच लाख रुपये द्यावेत, अन्यथा ॲट्राॅसिटी विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करू, अशी धमकी भाडेकरुंनी दिल्याने शहराजवळील मोहाडी उपनगरात घरमालकाने गळफास घेतला.
याप्रकरणी दोघा भाडेकरुंसह आठ जणांविरूद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनिता पाटील (४०, रा.संजयभाऊ नगर, मोहाडी उपनगर,धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन थोरात आणि रूपाली थोरात हे दोन भाडेकरू आहेत. दोघांनीही मार्चपासून घरभाडे दिले नाही. यामुळे त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले होते. घर रिकामे करून देण्यास त्यांनी नकार दिला. उलट घर रिकामे करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.
हेही वाचा… चाळीसगावात अफू बोंडासह चुरा मिळून २८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पैसे न दिल्यास अॅट्राॅसिटी विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. घरमालक पाटील यांना आर्थिक अडचण होती. भाडेकरु घर रिकामे करून देत नाहीत. घर रिकामे करण्यासाठी पाच लाख रुपये कुठून आणायचे, या मानसिक विवंचनेत योगीराज पाटील यांनी अखेर धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील एका बंद हॉटेलमध्ये गळफास घेतला. पोलिसांनी भाडेकरू सचिन थोरात, रुपाली थोरात तसेच त्यांना मदत करणारे जयवंत पाटील, छाया पाटील, ऋषिकेश पाटील, लताबाई साळुंके, शितल सूर्यवंशी, शोभा बागल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे