मालेगाव : गेल्या डिसेंबर महिन्यात बागलाण तालुक्यातील चिराई येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातल्याने चर्चेत आलेल्या मालेगाव तालुक्याच्या कजवाडे येथील महेंद्र सूर्यवंशी या तरुण शेतकऱ्याने एका गरीब कामगाराचा सापडलेला भ्रमणध्वनी परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.
गेल्या २३ डिसेंबर रोजी फिरत्या नारळाच्या कार्यक्रमासाठी आलेले नितेश राणे बोलण्यासाठी उभे राहिल्यावर अचानक व्यासपीठावर आलेल्या महेंद्रने त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली होती. वाढलेली आवक व अन्यायकारक निर्यात शुल्क यामुळे कांद्याचे भाव अचानक गडगडले. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये रोष निर्माण झाला. कांदा उत्पादकांची ही भावना राणे यांच्यामार्फत सरकार दरबारी पोहोचावी आणि निर्यात शुल्क रद्द व्हावे, ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे महेंद्रने म्हटले होते. कार्यक्रमात व्यत्यय आणला म्हणून त्याने उपस्थित वारकऱ्यांची व्यासपीठावरून जाहीर माफी देखील मागितली होती. यानंतर पोलिसांनी महेंद्रला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. नंतर समज देऊन त्याला सोडून देण्यात आले.
महेंद्र हा आधी नाशिक येथे रात्री ऑटोरिक्षा चालवून दिवसा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. करोना संकट काळात लागलेल्या टाळेबंदीमुळे त्याला रिक्षासह गावी परतावे लागले. तेव्हापासून रिक्षा पत्र्याच्या शेडमध्ये उभी करून त्याने वडिलांना मदत म्हणून शेती व्यवसाय सुरू केला होता. दुष्काळ व नापिकीमुळे सलग दोन वर्षे शेती व्यवसाय आतबट्टयाचा ठरला. यंदा जास्त पावसामुळे आधीच कांदा उत्पादन घटले असताना उरला सुरला कांदा काढणीवर आला तेव्हा १० दिवसांत दर निम्म्यावर खाली आले. त्यामुळे शेतीतून हाती काहीही न आल्याने १ जानेवारी रोजी महेंद्रने पुन्हा रिक्षासह नाशिक गाठले. शेतीला मदत व कुटूंबाचा खर्च भागविण्यासाठी तो तेथे रिक्षा व्यवसाय करु लागला. सोमवारी रात्री आडगाव नाका परिसरात बसलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणध्वनी त्याच्या रिक्षात पडला होता. मंगळवारी सकाळी भ्रमणध्वनी मालकाने पलीकडून फोन केल्यावर महेंद्रने तो घेण्यासाठी आडगाव पोलीस ठाण्यात त्याला बोलावले. ठरलेल्या वेळी भ्रमणध्वनीसह महेंद्रही पोलीस ठाण्यात पोहोचला. ओळख पटल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या समक्ष हा भ्रमणध्वनी मालकाकडे सुपूर्त करण्यात आला. भ्रमणध्वनीची किंमत सुमारे २० हजार रुपये आहे व ज्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी हरविला होता,ती व्यक्ती एक गरीब कामगार आहे. या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी महेंद्रचे कौतुक केले आहे.