थंडगार झालेल्या वातावरणात सरत्या वर्षांला निरोप देताना नववर्षांचे दणक्यात स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज होत आहेत. या पाश्र्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनी विविध कार्यक्रमांची आखणी करत आकर्षक पर्याय समोर ठेवले आहेत. या दिवशी पहाटेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला असला तरी त्यासाठी सशुल्क परवाना घेणे बंधनकारक आहे. जादा वेळ उपलब्ध करताना शासनाने तिजोरी भरण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येते. परवाना न घेता हॉटेल सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सालाबादाप्रमाणे यंदाही ‘चिअर्स.. नो चिअर्स..’चा वाद सुरू असला तरी सरत्या वर्षांला हसत-खेळत निरोप देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी मग घरी मिसळपासून ते हॉटेलमधील टेबल नोंदणीपर्यंत वेगवेगळ्या पर्यायांचा विचार आर्थिक क्षमतेनुसार केला जातो. ग्राहकांच्या या अभिरुचीचा विचार करत हॉटेल व्यावसायिक आकर्षक किमतीत विविध पर्याय समोर ठेवतात. यंदा हॉटेलांना या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मान्यता मिळाल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहरातील शेकडो हॉटेलचालक ‘थर्टी फस्र्ट सेलिब्रेशन’च्या नियोजनात मग्न आहेत. यासाठी काहींनी संगीत मेजवानी, काहींनी क्लबच्या माध्यमातून कार्यक्रम, काही मनोरंजनात्मक स्पर्धा यासह अन्य पर्यायांची चाचपणी केली आहे. काही ठिकाणी मोठय़ा आकारातील ‘एलईडी स्क्रीन’वर कार्यक्रमांचा आस्वाद घ्या किंवा डीजेच्या तालावर थिरका. अशी व्यवस्था होत आहे. या घडामोडी सुरू असताना शहर पोलिसांनी बुधवारी हॉटेल व्यावसायिकांसाठी एक परिपत्रक प्रसिद्ध केले. या दिवशी ज्या हॉटेल व्यावसायिकांना पहाटे पाचपर्यंत आपले हॉटेल सुरू ठेवायचे आहे त्यांना पोलीस यंत्रणेकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. रात्री बारानंतर हॉटेल सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकांना प्रत्येक तासाला २५० रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे ज्या व्यावसायिकाला या दिवशी पहाटेपर्यंत हॉटेल सुरू ठेवायचे आहे, त्यास १२५० रुपये मोजावे लागतील. तासनिहाय शुल्काचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. हा परवाना न घेता हॉटेल सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या माध्यमातून या दिवशी महसूल गोळा करण्याकडे शासनाने लक्ष दिले आहे. हॉटेलचालकांसाठी उपरोक्त शुल्क अधिक नसले तरी त्याची अप्रत्यक्षपणे वसुली ग्राहकांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा