नाशिक : शहरातील महात्मानगर आडगाव, कॅनडा कॉर्नर, सातपूर आणि गोळे कॉलनी-अशोक स्तंभ परिसर (टीपी -१), गोविंदनगर, मोतीवाला कॉलेज या भागातील रेडिरेकनर दर अर्थात जमिनीच्या सरकारी मूल्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. इतर भागात ती वाढ पाच ते साडेनऊ टक्क्यांपर्यंत आहे. मुळात शहरातील अनेक भागात रेडिरेकनरचे दर आधीपासून जास्त होते. तेच पुन्हा वाढल्यामुळे घरांच्या एकूण किंमतीत तीन ते चार टक्के वाढ होण्याचा निष्कर्ष ‘नरेडको’ने काढला आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोनेही ती शक्यता वर्तवली.
राज्य शासनाने जमिनीचे सरकारी मूल्य अर्थात रेडिरेकनरच्या दरात नाशिक शहरासाठी सरासरी ७.३१ टक्के तर, मालेगाव शहरात ४.८८ टक्के वाढ केली आहे.
करोनानंतर सामान्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. याचा विचार करून शासनाने मध्यंतरी वार्षिक बाजार मूल्य दरात वाढ केली नव्हती. चालू आर्थिक वर्षात मात्र यात वाढ झाली. कोणत्या भागात जमिनीचे सरकारी मूल्य किती वाढले, याचा अभ्यास बांधकाम व्यावसायिकांकडून केला जात आहे. रेडिरेकनरचे सर्वाधिक म्हणजे जवळपास १० टक्के दर हे महात्मानगर, आडगाव, सातपूर आणि डीपी-ए म्हणजे गोळे कॉलनी, अशोक स्तंभपर्यंतच्या क्षेत्रात वाढले असल्या्कडे नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवांदे यांनी लक्ष वेधले. गोविंदनगर, मोतीवाला कॉलेज भागासह इतरत्र कमी-अधिक प्रमाणात तशीच वाढ झाली आहे.
रेडिरेकनरचे दर हे बांधकाम विकास शुल्क, टीडीआर, मुद्रांक आणि प्राप्तीकर या चार बाबींशी संलग्न असतात. त्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होणे स्वाभाविक असल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपासून रेडिरेकनरचे दर वाढविले नसल्याचे सांगितले जाते. मात्र, नाशिक शहरात आधीपासून हे दर अधिक होते. कॅनडा कॉर्नर भागात जुन्या तक्त्यानुसार प्रति चौरस मीटर सहा हजार रुपये दर होता. आता तो सहा हजार ७०० रुपये करण्यात आला. माफक वाढ समजण्यासारखी होती. या दराचा विविध घटकांशी संबंध असतो. आता नोंदणी शुल्कात वाढ होईल. विविध संलग्न बाबींचा विचार करता शहरातील घरांच्या किंमतीत तीन ते चार टक्क्यांनी वाढ होईल. – सुनील गवांदे (अध्यक्ष, नरेडको – नाशिक )
क्षेत्रनिहाय रेडिरेकनर दरातील वाढ (प्रति चौरस मीटरनुसार टक्केवारी)
सातपूर, डीपी-एक, कॅनडा कॉर्नर, आडगाव आणि महात्मानगर – १० टक्के
गोविंदनगर – ९.२८ टक्के
मोतीवाला कॉलेज परिसर – ९.२ टक्के
अंबड – ८.५ टक्के
मखमलाबाद – ८.१ टक्के
म्हसरूळ – ७.७१ टक्के
जेलरोड – ६.४ टक्के
हिरावाडी, तारवालानगर – सहा टक्के
गंगापूर रोड – पाच टक्के
पाथर्डी – ५.४ टक्के
कामटवाडा – ४.४८ टक्के