शिवसेनेतून मुंबईतील माझगावचे आमदार राहिलेले छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेल्यानंतर येवल्यातून निवडणूक लढले. शिवसेना सोडल्यानंतर ते येवल्यात गेले. तिथे त्यांना शिवसेनेच्या नेत्याविरोधात सामना करावा लागला होता. तिथे चार टर्म आमदार राहिल्यानंतर आता छगन भुजबळांनी राष्ट्रवादीतील फुटीदरम्यान शरद पवारांशी फारकत घेतली. त्यामुळे शरद पवारांनी समस्त येवलावासियांची काल (८ जुलै) माफी मागितली. “माझा अंदाज फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला. माझ्या विचाराला तुम्ही साथ दिली. मात्र, माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या”, असं शरद पवार म्हणाले. भर जाहीर सभेत शरद पवारांनी माफी मागितल्याने छगन भुजबळांनी आता उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवारांनी माफी का मागितली हे मला कळलंच नाही. त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या. पण येवल्यातील सभा रद्द केली नाही. ओबीसीचा नेता आहे, म्हणून ते इथे पहिल्यांदा आले. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. किती ठिकाणी माफी मागणार आहात? गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत, पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार आहात का? काय केलं मी?”, असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला आहे.
छगन भुजबळ येवल्यात कसे आले?
“येवल्याशी माझा खास संबंध नव्हता. एकदा शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला गेलो होतो. त्यानंतर राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराला गेलो होतो. परंतु, येवलावासियांनी एक मुद्दा मांडला. आमच्या तालुक्यात दुष्काळ आहेच, पण विकासही झालेला नाही. आम्हाला विकासासाठी तुम्ही पाहिजे आहात. येवलावासियांचं म्हणणं ऐकल्यानंतर मी पवारांना सांगितलं की जुन्नरचा चांगला विकास झाला आहे. मला काम करण्याची संधी येवल्यात आहे. मी येवल्याची निवड केली आहे. त्यामुळे येवला मी स्वतःहून मागून घेतला, मला देण्यात आला नव्हता. येवल्यात शिवसेनेचे उमेदवार होते. तेथे रिस्क होतीच. परंतु, संघर्ष केला, तिथल्या लोकांनी प्रेम दिलं आणि निवडून दिलं”, असा संपूर्ण घटनाक्रम छगन भुजबळांनी नाशिकमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कथन केला. शरद पवारांनी काल (८ जुलै)येवला येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला होता. शरद पवारांचे सर्व आरोप आज छगन भुजबळांनी खोडून काढले.
“येवल्यातील लोकांनी एकदा नाही, चार वेळा निवडून दिलं. एखाद्याला आपण एकदा निवडून येतो. पण काहीतरी प्रेम असेल तरच चार वेळा निवडून येतो. पण शरद पवार म्हणाले की २० वर्षांपूर्वी चुकीचा उमेदवार दिला. प्रशासकीय संकुलातील उद्घाटनात म्हणाले की बारामतीनंतर कोणाचा विकास झाला असेल तर येवल्याचा झाला. पण आता त्यांनीच माफी मागितली”, असंही छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा >> “मी इथे माफी मागण्यासाठी आलोय, कारण…”, येवल्यातल्या सभेत बोलताना शरद पवार भावनिक
“येवल्याचे लोक आभार मानताहेत की आलात तर जाऊ नका. त्यामुळे साहबेांनी माफी मागायचं कारण नाही. तुमचं नाव खराब होईल, माफी मागण्याची परिस्थिनी निर्माण होईल असं कोणतंही काम भुजबळांनी केलेलं नाही”, असंही स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं.
शरद पवार काय म्हणाले होत?
भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार म्हणाले, “आज मी इथे का आलोय? मी इथं कोणाचं कौतुक करण्यासाठी आलो नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठीदेखील आलो नाही. मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय. मी मतदारांची माफी मागायला आलोय. माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला. माझे अंदाज फारसे चुकत नाहीत. पण इथं मात्र माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हालाही यातना झाल्या असतील. तर माझं कर्तव्य आहे की, मी तुमची माफी मागितली पाहिजे.”