लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघातून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार करायचे आहे. त्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागेल, असे आवाहन करत शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेनेकडे आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार गोडसे हेच राहणार असल्याचे एकप्रकारे जाहीर केले. महत्वाची बाब म्हणजे, महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तत्पुर्वीच शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेवरील उमेदवार जाहीर केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा आपल्याकडे घेण्याचा आग्रह भाजपच्या नेत्यांनी धरला होता. त्यामुळे महायुतीत ही जागा नेमकी कुणाला मिळणार याविषयीचा संभ्रम मेळाव्यातून दूर झाला. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार करावयाचे असल्याचे नमूद केले. त्यासाठी गोडसे यांच्यासह सर्वांना एकदिलाने काम करावे लागेल, तरच नाशिकची जागा जिंकता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करू; राहुल गांधी यांची नंदुरबार येथे ग्वाही; ‘भारत जोडो न्याय यात्रे’चे राज्यात स्वागत

दरम्यान, काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ सुरू होता. शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यातील जागेवर भाजपने हक्क सांगितला होता. नाशिकसह राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघात कोण इच्छुक, उत्तम उमेदवार कोणता, कोणत्या पक्षाची कुठे शक्ती जास्त आहे, यावर महायुतीकडून विचार केला जात असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात होते. महायुतीतील कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे अधिकृतपणे अद्याप जाहीर झालेले नाही. या स्थितीत शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेवरील उमेदवार जाहीर करीत ही जागा आपल्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How was the candidate of nashik announced before the seat allocation of mahayuti mrj