नाशिक : हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवला असून नाशिक रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्याचा स्फोट होणार आहे, अशी धमकी ट्विटर वरून रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर खात्री करण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटे ४.१५ वाजता गाडी येताच रेल्वेसह जळगाव पोलीस दल व बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणीत कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून न आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली.

सोमवारी पहाटे ३.०५ वाजता मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाला ट्विटरद्वारे हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याची आणि त्याचा स्फोट नाशिक स्थानक येण्यापूर्वी होणार असल्याची धमकी मिळाली. यासंदर्भात भुसावळ रेल्वे पोलीस दल आणि जळगाव रेल्वे पोलीस दल तसेच स्थानकप्रमुख कौस्तुभ चौधरी यांना तत्काळ माहिती देण्यात आली. जळगाव पोलीस दलाचे बॉम्बशोधक पथक देखील रेल्वे स्थानकात तपासणीसाठी हजर झाले. भुसावळहून निघालेली गाडी पहाटे ४.१५ वाजता जळगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर येताच रेल्वे पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तब्बल दोन तास ११ मिनिटे गाडीची संपूर्ण तपासणी केली.

हेही वाचा : पाणी प्रश्नी नाशिक महापालिकेवर महिलांची शहर बसमधून धडक, प्रवेशद्वारावर हंडे आपटून निषेध

भुसावळ रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी अशोक कुमार, बॉम्बशोधक पथकाचे निरीक्षक अमोल कवाडे यांच्यासह जळगाव व भुसावळ रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच इतरांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. गाडीत बॉम्ब तसेच कोणताही स्फोटक पदार्थ सापडला नाही. त्यानंतर हावडा-मुंबई मेल जळगाव स्थानकातून सकाळी सहा वाजून २८ मिनिटांनी मुंबईकडे रवाना करण्यात आली. दोन तासापेक्षा जास्त वेळ ताटकळलेल्या प्रवाशांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला.