लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथयात्रेला सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात मंगळवारी सायंकाळी श्री काळाराम मंदिरापासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली. रात्री उशीरा रथयात्रा शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे.
श्री काळाराम मंदिर तसेच श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्रीराम रथ आणि श्रीगरुड रथाचे विधीवत पूजन यंदाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेनिमित्त दोन्ही रथांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीराम नवमीनंतर येणाऱ्या एकादशीला श्री काळाराम देवस्थानच्या वतीने रथयात्रा काढण्यात येते.
रथयात्रा जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती, वाहतूक व्यवस्थापन, गरुड रथाची सजावट, सुरक्षा व्यवस्था, ब्रेक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रथसेवकांचा गणवेश, स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर विश्वस्त आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे रथयात्रेला सुरळीत सुरुवात झाली. रथयात्रेपुढे कपालेश्वर मंदिराचे ढोलपथक होते. यावेळी काहींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले. रथयात्रेत नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. राम, सीता, लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा काहींनी परिधान केली होती. उपस्थितांकडून अखंडपणे रामनामाचा गजर करण्यात येत होता.
दरम्यान, रथयात्रेमुळे गोदापात्रात गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गोदापात्रात जमा झालेल्या पानवेली दूरवह वाहून गेल्या. रथयात्रा उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने साध्या वेशात तसेच वर्दीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली
रथावर लहान मुले
रथयात्रा हा नाशिककरांसाठी श्रध्देचा विषय. या यात्रेचा अविभाज्य भाग होता यावे यासाठी नाशिककरांनी श्री काळाराम मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दूरून का होईना, दर्शन व्हावे, यासाठी रथयात्रा मार्गावर मिळेल त्या ठिकाणी लोक उभे होते. रथावर कोणीही उभे राहू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले असतानाही लहान मुलांसह अनेकांनी रथावर गर्दी केली होती. अशा हौशी लोकांना खाली उतरवितांना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते.