वणी – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंग गडावर विधीवत पूजन व मिरवणूक काढल्यानंतर मध्यरात्री कीर्तिध्वज शिखरावर फडकला. पहाटेपासून त्याचे दर्शन भाविकांना होत आहे. शिखरावर जाण्यासाठी बाहेरुन दिसणारा कुठलाही मार्ग नाही. झाडे, झुडपे नाहीत. त्यामुळे कीर्तीध्वज शिखरावर कसा लावला जातो, हे अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सप्तश्रृंगी गडावर सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरू आहे. भगवतीच्या दर्शनासाठी उत्तर महाराष्ट्रातून लाखो भाविक अनवाणी पावलांनी गडावर दाखल होत आहेत. सकाळी देवीच्या अलंकारांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. महापूजा विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे यांनी सपत्नीक व ग्रामपंचायत सदस्या जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.
हेही वाचा >>> नाशिक : पंतप्रधानांकडून प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी युवक काँग्रेसची पत्र मोहीम
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सव यात्रेदरम्यान खान्देशातून माहेरची भेट घेऊन आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत दुपारी पारंपरिक पद्धतीने मानकरी पूजाऱ्यांसह कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन देवी संस्थानचे अध्यक्ष वर्धन देसाई, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी तथा तहसीलदार बी.ए. कापसे, ॲड. ललित निकम, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर तसेच ध्वजाचे मानकरी गवळी कुटुंबीय, पोलीस पाटील शशिकांत बेनके आदींच्या हस्ते करण्यात आले. नंतर देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सप्तश्रृंगी मातेच्या जयजयकाराने गड परिसर दुमदुमून गेला होता. मध्यरात्री सप्तश्रृंग गडाच्या शिखरावर भगव्या रंगाचा कीर्तिध्वज फडकला. यावर्षी नाशिक ग्रामीण पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच मुंबईच्या अनिरुद्ध अकॅडमीचे सहकार्य लाभले. कीर्तिध्वजाच्या सोहळ्याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, निरीक्षक समाधान नागरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सरपंच रमेश पवार आदी उपस्थित होते.
ध्वजवंदनाची परंपरा
समुद्रसपाटीपासून ४६०० फूट उंच असलेल्या सप्तशृंग गडाच्या शिखरावर दरेगावचे पाटील (गवळी) यांना कीर्तिध्वज फडकविण्याचा मान असतो. शिखरावर जाण्यासाठी बाहेरुन दिसू शकेल असा मार्ग नाही. सर्वत्र खाचखळगे असतानही पाटील शिखरावर जातात कसे, असा प्रश्न भाविकांमध्ये चर्चिला जातो. हा चमत्कारिक अनुभव घेण्याकरिता हजारो भाविक गडावर उपस्थित असतात. गवळी कुटुंबातील मानकरी शिखरावर जाऊन ध्वजवंद करण्याची परंपरा आहे. नवरात्रोत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री ध्वज फडकवितात. ध्वजासाठी ११ मीटर कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते. तसेच जातांना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य आदी वस्तू दिल्या जातात. दुपारी गावातून कीर्तिध्वजाची मिरवणूक निघून लाखो भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडतो. सायंकाळी भगवती मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय भगवतीसमोर नतमस्तक होऊन शिखरावर चढणे सुरु करतात. जुना ध्वज काढून त्या जागी नवा ध्वज फडकवून विधिवत पूजा करतात. शिखरावर ध्वज फडकल्यानंतर भाविक ध्वजाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागतात.