रेल्वे व खासगी वाहनांवर मोर्चेकऱ्यांची भिस्त

बुधवारी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला नाशिकमधून मोठय़ा प्रमाणात रसद पुरविण्याचे काम होणार आहे. महामार्ग व रेल्वेने मार्गस्थ होणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी ठिकठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी स्थानिक युवकांनी स्वीकारली आहे.मोर्चाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था न केल्यामुळे अनेकांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला. गर्दीच्या धसक्याने दररोज नाशिक-मुंबई अपडाऊन करणाऱ्या बहुतांश चाकरमान्यांनी या दिवशी सुटीचे घेण्याचे ठरवले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासह शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, कोपर्डीतील दोषींना कठोर शिक्षा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने मोर्चे काढले. नाशिकमध्येही लाखोंच्या संख्येने शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला होता. राज्यात विविध शहरांमध्ये मोर्चे निघाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी मुंबईत पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या जनजागृतीसाठी महिनाभरापासून स्थानिक पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली. मुंबई-आग्रा महामार्गावरून उत्तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे रस्ते मार्गाने जातील. राज्यातील इतर भागातील बांधवांकडून रेल्वेचा आधार घेतला जाईल. ही बाब लक्षात घेऊन रस्ते व रेल्वे मार्गावर स्थानिक पातळीवरून सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा, अल्पोहार, वाहनतळ व्यवस्था, पाणी वाटप आदी तजविज करण्यात आली आहे.

दरम्यान, मोर्चासाठी मुंबईला जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी राहील असा अंदाज असूनही परिवहन महामंडळाने नाशिक-मुंबईसाठी कोणतीही जादा बस सोडलेली नाही. दुसरीकडे देवगिरी एक्स्प्रेसला एक जादा बोगी जोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेल्वे स्थानकावर गर्दी झाल्यास व्यवस्थापनाची तयारी झाल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वयंसेवक व तत्सम स्वरूपाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांनी सायंकाळपासून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करण्यास सुरुवात केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावा गावातून खासगी वाहने व बसद्वारे मोर्चेकऱ्यांना मुंबईला नेण्याची व्यवस्था केली आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चामुळे दररोज मुंबईला ये-जा करणाऱ्या चाकरमानी सुटीच्या घेण्याच्या निर्णयाप्रत आले आहे. पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेससह कसारामार्गे लोकलने मुंबईला जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मोर्चामुळे रेल्वे व बसला गर्दी राहण्याची शक्यता आहे. यामुळे गोंधळ टाळण्यासाठी या दिवशी मुंबईला जाण्याऐवजी चाकरमानी घरी बसणे पसंत करण्याच्या मानसिकतेत आहेत.

७८० स्वयंसेवक

मोर्चाच्या तयारीसाठी शहरात आधीच वातावरणनिर्मिती करण्यात आली. मोर्चेकऱ्यांना सभेच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी ७८० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली.  मोर्चासाठी नाशिक-मुंबई महामार्गावर २५० फलक लावण्यात आले. मुख्य चौकांसह शहर परिसरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. लहान व मोठय़ा आकारातील एक लाख १० हजार रंगीत स्टिकर तयार करण्यात आले. मोर्चाच्या प्रचारार्थ ५० हजार पत्रकांचे वाटप करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मोर्चात सहभागी होणाऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आडगाव, जकात नाका, विल्होळी, घाटन देवी व आसनगाव येथे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. घोटी टोलनाक्यावर नाश्ताची व्यवस्था आहे. या शिवाय स्वंयसेवकांना टी-शर्ट व शिटय़ा देण्यात आल्या आहेत. चार पदरी रस्त्यामुळे नाशिकहून मुंबई अवघ्या काही तासात गाठता येते. यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून मोर्चात अधिकाधिक मराठा बांधव सहभागी व्हावे, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले.

Story img Loader