पाणी उपशामुळे हरीण, काळविटांसमोर संकट
पाण्यावरून जिल्ह्याजिल्ह्यात उभा संघर्ष पेटला असताना स्थानिक पातळीवर आता बंधारे वा तळ्यात उपलब्ध असणाऱ्या पाण्यावरून वाद झडणार असल्याचे दिसत आहे. येवला तालुक्यात हरणांचे वास्तव्य असणाऱ्या भागातील तलावातून बेसुमार पाणी उपसा होत असल्याने वन्य-प्राण्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे या ठिकाणी पाणी शेती वा मनुष्यासाठी वापरायचे की वन्यप्राण्यांसाठी, असा पेच आहे. तलावातील पाणी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने स्थानिकांसह हरणांना पुढील काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याकडे नेचर क्लब ऑफ नाशिकने लक्ष वेधले आहे.
येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, नगरसूल, भारम, कोळम या परिसरात हरीण व काळविटांचे हजारोंच्या संख्येने वास्तव्य आहे. हा संपूर्ण परिसर पावसाअभावी दुष्काळाच्या सावटाखाली आहे. या पाश्र्वभूमीवर, नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त क्षेत्रात सर्वेक्षणाद्वारे हरीण व काळविटांच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार पुढे आले. नगरसूलपासून हाकेच्या अंतरावर कोळगावजवळ कानिफनाथ बंधारा आहे. त्या ठिकाणी जंगलातून हरणे पाणी पिण्यासाठी येत असतात. परंतु, या बंधाऱ्यातून पाण्याचा बेकायदेशीरपणे उपसा होत असल्याने लवकरच तो कोरडाठाक पडण्याची भीती आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि हरिणांवर पुढील काळात पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ येईल. हरीण व काळविटांना पाणी मिळावे म्हणून वन विभागाने काही ठिकाणी वनतळे निर्माण केली; परंतु, ते निव्वळ कागदोपत्री बनल्याचे दिसते. काही महिन्यांपूर्वी हरणांच्या संवर्धनासाठी ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता मिळाली. त्या अनुषंगाने वन विभागाने नवनवीन योजना व प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले: परंतु, प्रत्यक्षात हरीण व काळवीट संवर्धनाच्या दृष्टीने कोणतेही काम झाले नसल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केली.
या सर्व घडामोडींकडे वन विभाग आणि पाटबंधारे विभागाने डोळेझाक करण्याची भूमिका स्वीकारल्याचा आरोपही संस्थेने केला. हरीण व काळविटांसाठी पाण्याची व्यवस्था न गेल्यास पुढील काळात मानव विरुद्ध वन्यप्राणी असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. पाण्यासाठी भटकंती करणारे हरीण व काळवीट कठडा नसलेल्या विहिरीत पडून तसेच वस्तीवरील कुत्र्यांच्या हल्ल्यात मरण पावल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. यामुळे वन विभागाने स्थानिक शेतकऱ्यांना विहिरींना कथडे करण्यास बाध्य करावे तसेच संवर्धन क्षेत्राचा विकास करावा यासाठी संस्था जिल्हा प्रशासनास साकडे घालणार आहे. तलावातून बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, विहिरींना कुंपण, गावांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती, भविष्यात पाण्याचे नियोजन, वन विभागाच्या जमिनीत गवताची व्याप्ती वाढविणे, गस्तपथकाची नेमणूक करण्याची नितांत गरज आहे. सर्वेक्षणात संस्थेचे पक्षीमित्र उमेश नागरे, आशीष बनकर, दर्शन घुगे, सागर बनकर, आकाश जाधव, कुणाल पवार आदी सहभागी झाले.

सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी
* हरणांना पिण्यास पाणी नाही
* तलावातून अनेक मोटारींद्वारे पाणी उपसा
* गवताळ जमिनीवर शेतकऱ्यांचे अतिक्रमण
*पाण्यासाठी हरीण शेतात जात असल्याने पिकांचे नुकसान
*वन विभागाचे गस्ती पथक अंतर्धान
*रस्त्यांवर हरणांच्या अपघाताची शक्यता
*गवताळ प्रदेश कमी झाल्याने हरीण गावाकडे येण्याच्या प्रमाणात वाढ
*वन्यप्राणी-शेतकरी यांच्यात संघर्ष

 

Story img Loader