लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) दोन्ही जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आधीच पक्ष संघटन खिळखिळे झाले असताना महिला जिल्हा संघटक महानंदा पाटील यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे पाटील यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
महानंदा पाटील या जळगाव जिल्ह्यातील सक्रिय महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक होत्या. त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम करताना महिलांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांचा राजीनामा पक्षाच्या महिला आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पाटील यांनी यापूर्वीच पक्ष नेतृत्वाला असंतोषाची कल्पना दिली होती; परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजी व स्थानिक पातळीवरील नेतृत्वाच्या वागणुकीमुळे अनेक जुने कार्यकर्ते नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या कारवाईनंतर जिल्हाप्रमुखांना पक्ष सोडावा लागला होता, त्यानंतर आता महिला जिल्हा संघटकांनीही राजीनामा दिल्याने ठाकरे गटासाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.
आणखी वाचा-संत कबीरनगर झोपडपट्टीविरोधात जनहित याचिका
पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, आगामी काळात पक्षांतर्गत बदल घडवून आणण्याचे संकेत दिले आहेत. पाटील यांनी त्यांचा दोन पानी राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनामा पत्रात अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून भर मेळाव्यात आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याबाबतची तक्रार इतर महिला पदाधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांच्याकडूनही तशीच वागणूक देण्यात आली. पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यावर भेट दिली जात नव्हती. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कोणत्याही पदावर काम करण्याची आपली इच्छा नसल्याचे पाटील यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.