जळगाव – खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून जळगावकरांची लवकरच मुक्तता होणार आहे. शहरातील रस्ते आता काँक्रिटचे होणार असून, त्यासाठी शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात ५० कोटी वितरितही करण्यात आले आहेत. सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक विभागामार्फत केली जाणार आहेत.
महापालिका निवडणूक जवळ आल्याने शासनाकडून विकासकामांबाबत घोषणा केल्या जात आहेत. विकासकामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधीही सरसावले आहेत. जानेवारीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली होती. जळगावातील रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने शहरातील रस्तेकामांचे तीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. पैकी शंभर कोटींच्या कामांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून याबाबतचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. यात शहरातील सर्व प्रभागांतील उपनगर व कॉलनी भागातील रस्त्यांचा या निधीतून होणाऱ्या कामांत समावेश करण्यात आला आहे. याआधी शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील सहा रस्त्यांसाठी ८५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. अमृत योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. मात्र, ४२ कोटींच्या निधीतून काही कामे मार्गी लागल्यानंतर आता इतर रस्त्यांचीही कामे मार्गी लागणार आहेत.