धुळे : शहरातील पांझरा नदीपात्रात पोषण आहाराची शेकडो रिकामी पाकिटे आढळल्याने खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यात महिला व बालविकास प्रकल्प अधिकार्यांच्या अधिपत्यखाली जवळपास २०० अंगणवाडी केंद्रातून अशी पोषण आहाराची पाकिटे वितरीत करण्यात येतात. यामुळे ही रिकामी पाकिटे नेमक्या कोणत्या भागातील अंगणवाडीची असावीत, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या गंभीर प्रकाराची नोंद घेत सखोल चौकशीचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक चाटे यांनी दिले आहेत.
धुळे शहरातील पांझरा नदीपात्रात पोषण आहाराची रिकामी पाकिटे एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने आढळून आल्याने ये-जा करणाऱ्यांची त्या ठिकाणी गर्दी झाली. या पाकिटातील पोषण आहार नेमका गेला कुठे, रिकामी पाकिटे नदीपात्रात टाकण्याचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. धुळे जिल्ह्यातील विविध अंगणवाडी केंद्रातील बालकांना अशी पोषण आहाराची पाकिटे दिली जातात. महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली वितरीत होणारी पोषण आहाराची पाकिटे जबाबदारीने पुरविण्याचे काम संबंधितांवर बंधनकारक आहे. इतकेच नव्हे तर, लाभार्थ्यांची यादीही अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना एकाचवेळी पोषण आहाराची शेकडो पाकिटे नदीपात्रात टाकण्यात आल्याने याबाबतचे गांभिर्य वाढले आहे.
हेही वाचा…नाशिकमध्ये तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना – दोन महिलांसह युवकाचा मृत्यू
महाकाली मंदिराजवळ पांझरा नदीतील पाईप मोरी पुलावजळ ही पाकिटे आढळली. एनर्जी ड्रिंक्स, तूरडाळ, खिचडी प्रिमिक्स असा गरोदर महिला व स्तनदा माता, किशोरवयीन मुलींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत हा पोषण आहार वितरीत करण्यात येतो. साधारणपणे एक किलो ५० ग्रॅम वजनाच्या पोषण आहाराची ही पाकिटे असल्याचे या ठिकाणी आढळून आले.
हेही वाचा…सिटीलिंक बसच्या धडकेने बालिकेचा मृत्यू, आजोबा जखमी
धुळे जिल्ह्यातील जवळपास २०० अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून दोन ते तीन हजार पाकिटे नेमक्या कोणत्या भागातून गायब झाली आहेत, ते चौकशीत उघड होईल. यामुळे या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विविध भागात शासनातर्फे पोषण आहाराच्या एकाच पद्धतीच्या नमुन्यांची पाकिटे वितरीत केली जातात. यामुळे पांझरा नदीत आढळलेली पोषण आहाराची रिकामी पाकिटे नेमकी कुठली आहेत, हे शोधावे लागेल.ही पाकिटे आपल्या जिल्ह्यातील नसावीत, असे प्रथमदर्शी दिसते. तरीही या पाकिटांचा हिशेब लागला नाही तर चौकशीत दोषी आढळून आलेल्या कुठल्याही कर्मचार्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.– प्रदीप चाटे (बालविकास प्रकल्प अधिकारी, धुळे)
© The Indian Express (P) Ltd