लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : करोना महामारीमुळे अनेक कामांना खीळ बसली आहे. शैक्षणिक क्षेत्रही यास अपवाद नाही. जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा झाला असला तरी अद्याप विद्यार्थी संख्या, शिक्षकांची पदे या विषयी माहिती जमा करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला भरण्यात येणारे सरल पोर्टल अद्याप भरण्यात आलेले नाही. या संदर्भातील माहिती संकलित करण्याविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून, गटविकास अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा जूनमध्ये ऑनलाइन पद्धतीने झाला असला तरी शैक्षणिक वर्षांशी संबंधित अनेक कामे रखडली आहेत. यापैकी विद्यार्थ्यांची, शाळेची तपशीलवार माहिती असणाऱ्या सरल पोर्टलवर या वर्षांची माहिती अद्याप टाकण्यात आलेली नाही. करोना तसेच टाळेबंदी, ऑनलाइन शिक्षणाचा गुंता यामुळे ही कामे रखडली आहेत. ३० सप्टेंबर ही मुख्याध्यापकांना अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात आली आहे. या सर्व माहितीवर संच मान्यता अवलंबून असल्याने ही माहिती लवकरात लवकर अद्ययावत करण्यात यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी
के ले. दरम्यान, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंद करणे, सर्व विद्यार्थ्यांच्याआधार कार्डची माहिती अद्ययावत करणे, स्टुडंट पोर्टलवरून २०१९-२०२०चे विद्यार्थी संच मान्यतेसाठी पुढे पाठविण्यात यावे, संच मान्यता पोर्टलवर कार्यरत शिक्षक आणि शिक्षके तर पदाची माहिती पुढे पाठवावी. हे काम वेळेत न झाल्यास आणि पोर्टल बंद झाल्यास संबंधित शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक यास जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.