नाशिक – शहरातील काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे काँग्रेसचे नेते तथा उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांना शहर पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. नंतर त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजकीय व्यक्तींना संबंधित ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे दलवाई यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना नंतर मुक्त केले जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. बुधवारी महापालिकेने हे धार्मिक स्थळ पोलीस बंदोबस्तात हटविले होेते. तत्पूर्वी मध्यरात्री परिसरात दंगल उसळली होती. या कारवाईवरून बराच वादंग झाल्यामुळे हा विषय जाणून घेण्यासाठी मंगळवारी हुुुसेन दलवाई हे नाशिक दौऱ्यावर आले.
शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रारंभी काही पदाधिकारी आणि स्थानिकांशी चर्चा केली. नंतर ते पोलीस आयुक्तालयात पोहोचले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या भेटीनंतर दलवाई हे काठे गल्लीत कारवाई झालेल्या धार्मिक स्थळ परिसरात भेट देण्यासाठी निघाले. त्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पखाल रस्ता आणि धार्मिक स्थळाच्या बाहेरील मार्गावर लोखंडी जाळ्या लावून खबरदारी घेण्यात आली आहे.
दलवाई यांना पोलिसांनी याठिकाणी रोखले. उपरोक्त ठिकाणी जाण्यास प्रतिबंध केला. दलवाई यांनी घटनास्थळी जाण्याचा हट्ट कायम ठेवल्याने अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
काठे गल्लीतील संबंधित धार्मिक स्थळाच्या जागेवर राजकीय व्यक्तींना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई हे तिथे जाण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नंतर दलवाई यांना सोडून दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.