आरोग्य विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना
अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राच्या दर्शनी भागावर ‘मी अवयवदाता आहे’ किंवा तत्सम अर्थाच्या सकारात्मक संदेशाची छपाई करावी, अशी सूचना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने आपल्या अखत्यारीतील राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना केली आहे.
संबंधित विद्यार्थी अवयवदाता आहे की नाही, याची शहानिशा न करता असा संदेश प्रसिद्ध करण्याने प्रश्न उपस्थित होऊ शकतात. याची जाणीव ठेवत विद्यापीठाने ही बाब ऐच्छिक असल्याचे सांगत सामाजिक कार्यात योगदानाची अपेक्षा ठेवली आहे.
अवयव दान चळवळ समाजात रुजल्यास गरजूंचे प्राण वाचू शकतात. अपघात किंवा इतर आजारात मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचे अवयव दान करता येतात. त्याकरिता कुटुंबीयांची संमती गरजेची असते. मागील दोन-तीन वर्षांत अपघाताच्या घटनांमध्ये मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचे अवयव गरजूंना देण्याकरिता काही कुटुंबांनी कठीण प्रसंगात पुढाकार घेतल्याची उदाहरणे आहेत.
अवयवदान मोहिमेविषयी काहींना साशंकता वाटते. अवयव दान करणाऱ्या कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात उपचारात विशेष सवलत देण्याची घोषणा मध्यंतरी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. परंतु, दान या संकल्पनेत सवलत देणे अभिप्रेत नसल्याचा मुद्दा काहींनी मांडला. शासन अवयवदान चळवळीला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच अंतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर अवयव दानाचा संदेश देणारे अर्थपूर्ण वाक्य छापण्याचे सूचित केले होते. त्या आधारे आरोग्य विद्यापीठाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपरोक्त सूचना केली आहे.
अवयवदानाविषयी जनजागृती करणे, त्याचे महत्त्व सामान्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविणे, अवयवदान चळवळीचा प्रचार, प्रसार करणे हे सर्व आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. सर्व महाविद्यालयांचे संस्थाचालक आणि प्राचार्यानी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राच्या दर्शनी भागावर अवयवदानाबाबत मी अवयव दाता आहे किंवा तत्सम अर्थाचा सकारात्मक संदेश छापावा, असे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. संदीप गुंडरे यांनी म्हटले आहे. ही बाब ऐच्छिक असून या सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अवयवदानाबद्दल वैद्यकीय विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करणे हा चांगला उपक्रम आहे. रुग्णहितासाठी जागृती गरजेची आहे. पण महाविद्यालयांना अशी सूचना करताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना गृहीत धरले आहे. मुळात, हा विषय प्रथम विद्यार्थ्यांना समजावून द्यावा लागेल. त्यांचे प्रबोधन करावे लागेल. विद्यापीठाने प्रथम त्यांचे प्रबोधन करावे. अवयवांची गरज आणि उपलब्धता समजावून द्यावी. तसे काहीही न करता ओळखपत्रावर थेट संदेश जाहीर करणे योग्य नाही. – वैद्य विजय कुलकर्णी (संपादक, आरोग्य चिंतन)